लोकांच्या प्रश्नात लक्ष घालण्याच्या सूचना
स्थैर्य, सोलापूर, दि .19: देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीही सोलापूर शहराने ब्रिटीशांविरूद्ध मात करून काही दिवस स्वातंत्र्य मिळविले होते. अशा लढवय्या शहरातील लोक हे निश्चितपणे कोरोनावरही मात करतील, असा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.
सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन कार्यालयाच्या सभागृहात कोरोना उपाययोजनाबाबत आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, खासदार ओमराजे निंबाळकर व्यासपीठावर उपस्थित होते.
खा. पवार म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तुम्ही लोकांच्या प्रश्नात लक्ष घाला, आम्ही तुमचे प्रश्न सोडवू. राज्य शासन आणि केंद्र सरकार यांच्याकडून आवश्यक असणारी सर्व मदत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातील. शहरातील महानगरपालिकेच्या आर्थिक आणि मनुष्यबळविषयक मागण्यांबाबत मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्याशी एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढला जाईल. यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता पुढील आठवड्यात सोलापूरचा दौरा करून एक व्यापक अहवाल सादर करतील, असेही त्यांनी सांगितले.
सोलापूर शहरातील कोरोनाचे संक्रमण ग्रामीण भागात होऊ नये यासाठी जिल्हा परिषदेने उपाययोजना कराव्यात. महानगर पालिकेच्या वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्या प्रश्नांबाबत आणि थकित वेतनाबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. शहरातील कोरोनाच्या तपासणीचे प्रमाणात वाढ झाली पाहिजे, त्यासाठी अँटिजेन टेस्टबरोबरच खाजगी प्रयोगशाळांचीही मदत घेण्यात यावी़ अशी सूचना त्यांनी केली.
‘सोलापूर जिल्ह्याशी माझे ऋणानुबंध’
सोलापूर जिल्ह्याशी माझे ऋणानुबंध आहेत, या शहराचे मी काही देणे लागतो. यासाठीच सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या (सीएसआर) माध्यमातून 500 ते 600 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध केले आहेत. त्यातील सोलापूर जिल्ह्यासाठी 80 इंजेक्शन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे सुपुर्द केली आहेत. याचा उपयोग गरीब आणि गरजू रूग्णांसाठी करावा, असे पवार यांनी यावेळी सांगितले. हे इंजेक्शन कोरोनाबाधित गंभीर रूग्णांवर उपयुक्त आहे. त्यानुसार याचा वापर करण्यात यावा, अशा सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या.