जागतिक मृदा दिन : वडजल येथे माती व पाणी परिक्षण कार्यक्रम

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. ०४ जानेवारी २०२५ | फलटण | श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण अंतर्गत ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वडजल येथे जागतिक मृदा दिनाच्या निमित्ताने माती व पाणी परिक्षणाचा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात माती व पाण्याचे परीक्षण करणे शेतकऱ्यांसाठी काळाची गरज असल्याचे मत माती व पाणी परीक्षण तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता खरात यांनी व्यक्त केले.

डॉ. प्राजक्ता खरात यांनी सांगितले की माती व पाण्याची गुणवत्ता शेतकऱ्यांना समजल्यास पिकांच्या उत्पादन वाढीसाठी त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. या कार्यक्रमादरम्यान, डॉ. खरात यांनी मातीचे आरोग्य याबद्दल माहिती देऊन मातीचा नमुना परीक्षणासाठी कसा गोळा करावा हे प्रात्यक्षिकासह दाखवले. शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्य पत्रिकांचे वितरण व विश्लेषणही करण्यात आले.

मंडळ कृषी अधिकारी सतिश निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना ऊस, फळबागा, गहू इत्यादींचे एकात्मिक व्यवस्थापन आणि सिंचन व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच, कृषीसहाय्यक तान्हाजी कुंभार यांनी देखील सेंद्रिय शेतीविषयी माहिती सांगितली. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची गुणवत्ता समजून घेण्यात मदत होईल, ज्यामुळे ते अधिक उत्पादनक्षम आणि स्थायी शेती पद्धती अवलंबू शकतात.

या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. व्ही.लेंभे व डॉ.ए.आर.पाटील आणि कार्यक्रम समन्वयक प्रा.ए.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या निकिता आल्हाट, निकम अंकिता, मुळीक प्राजक्ता, भोसले श्वेता, भोसले श्रावणी यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.

या कार्यक्रमाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी पुढील पावले उचलावीत, असे आश्वासन दिले गेले. माती परीक्षण केल्यामुळे जमीन क्षारयुक्त आहे की चोपण आहे ते ओळखता येते, त्यावर उपाययोजना करावी आणि पिकांची निवड, पाण्याचे योग्य नियोजन, आणि जमिनीची मशागत व्यवस्थित केली तर किडींचे व्यवस्थापन सुद्धा व्यवस्थित होते, हे देखील सांगितले गेले.


Back to top button
Don`t copy text!