दैनिक स्थैर्य | दि. ०३ जानेवारी २०२५ | फलटण | श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय, फलटण अंतर्गत ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत वडजल येथे माती व पाणी परिक्षणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा कार्यक्रम 2024 च्या डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये शेतकऱ्यांना माती व पाण्याच्या गुणवत्तेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
माती व पाण्याचे परीक्षण करणे शेतकऱ्यांसाठी काळाची गरज बनली आहे, असे मत माती व पाणी परीक्षण तज्ज्ञ डॉ. प्राजक्ता खरात यांनी व्यक्त केले. त्यांनी सांगितले की माती व पाण्याची गुणवत्ता शेतकऱ्यांना समजल्यास पिकांच्या उत्पादन वाढीसाठी त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो. या कार्यक्रमात डॉ. खरात यांनी मातीचे आरोग्य याबद्दल माहिती देऊन मातीचा नमुना परीक्षणासाठी कसा गोळा करावा हे प्रात्यक्षिकासह दाखवले.
कार्यक्रमादरम्यान मंडळ कृषी अधिकारी सतिश निंबाळकर यांनी शेतकऱ्यांना ऊस, फळबागा, गहू इत्यादींचे एकात्मिक व्यवस्थापन आणि सिंचन व्यवस्थापनाबद्दल मार्गदर्शन केले. तसेच, कृषीसहाय्यक तान्हाजी कुंभार यांनी देखील सेंद्रिय शेतीविषयी माहिती सांगितली. शेतकऱ्यांना जमिनीच्या आरोग्य पत्रिकांचे वितरण व विश्लेषणही करण्यात आले.
या उपक्रमासाठी श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. जे. व्ही.लेंभे, डॉ.ए.आर.पाटील आणि कार्यक्रम समन्वयक प्रा.ए.डी.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उद्यानकन्या निकिता आल्हाट, निकम अंकिता, मुळीक प्राजक्ता, भोसले श्वेता, भोसले श्रावणी यांनी हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला.
माती व पाणी परीक्षण कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीची गुणवत्ता समजून घेण्यात मदत होईल, ज्यामुळे ते अधिक उत्पादनक्षम आणि स्थायी शेती पद्धती अवलंबू शकतात. या कार्यक्रमाचा फायदा घेऊन शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी पुढील पावले उचलावीत, असे आश्वासन दिले गेले.