
स्थैर्य, फलटण, दि. २९ ऑक्टोबर : समाज प्रबोधन समाजात इतक्या खोलवर रुजले असतानाही आज समाजमन अस्वस्थ का होते आणि प्रबोधन नेमके कुठे कमी पडते, याचा गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. जगणं सुंदर आहे, ते अधिक समृद्ध करण्यासाठी पुस्तके वाचली पाहिजेत आणि प्रत्येकाने योग्य वेळी व्यक्त व्हायला शिकले पाहिजे. साहित्यिकांनी या संक्रमण काळातील गोष्टी योग्य वेळी टिपून त्या समाजापुढे आणल्यास, त्यातून निश्चितच योग्य प्रकारचे साहित्य निर्माण होऊन समाजाला नवी दिशा मिळेल, असे मत ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक रवींद्र बेडकीहाळ यांनी व्यक्त केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर माध्यमिक विद्यालय येथे आयोजित ३२ व्या ‘साहित्यिक संवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन फलटण, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा फलटण आणि वन विभाग फलटण यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य शांताराम आवटे, संयोजक व माणदेशी साहित्यिक ताराचंद्र आवळे, साहित्यिक सुरेश शिंदे, महादेवराव गुंजवटे, सुधीर इंगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या दुर्दैवी घटनेबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. समाजात आत्महत्या का होतात, यावर मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत चिंता व्यक्त केली. अशा घटना घडू नयेत यासाठी सर्वांनी समाजभान राखून समाज प्रबोधन केले पाहिजे, यावरही यावेळी भाष्य करण्यात आले.
रवींद्र बेडकीहाळ यांनी आगामी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर बोलताना, सातारकरांसाठी हे यजमानपद एक मोठी संधी असल्याचे सांगितले. “आपणाकडे यजमानपद असल्यामुळे आपण सर्वांनी कार्यकर्त्याची भूमिका पार पाडली पाहिजे. आज माणसा-माणसांमध्ये सुसंवाद निर्माण होणे ही काळाची गरज असून, त्यासाठी शाळा-महाविद्यालयांतून सुसंवादाचे कार्यक्रम आयोजित करणे गरजेचे आहे,” असे ते म्हणाले.
साहित्यिक चळवळ ही कोणा एकाची नसून ती सामुदायिक जबाबदारी आहे, असे सांगत बेडकीहाळ यांनी साहित्यिकांनी संवेदनशीरतेने लिखाण करून समाजप्रबोधन करावे, असे आवाहन केले. समाजात वाईट घटना घडू नयेत, यासाठी प्रत्येकाने व्यक्त झाले पाहिजे; आपल्या भावना व्यक्त केल्या तर अशा अघटित घटना घडणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ व साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशन आयोजित ‘माणदेशी युवा स्पंदन साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रवींद्र बेडकीहाळ यांचा साहित्यप्रेमी सेवाभावी फाउंडेशनच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच, साहित्यिक सुरेश शिंदे यांना ‘कविवर्य नारायण सुर्वे राज्यस्तरीय साहित्यिक पुरस्कार’ आणि आशा दळवी यांना ‘दैनिक लोकमत नवदुर्गा पुरस्कार’ मिळाल्याबद्दल त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याच कार्यक्रमात, सातारा येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या लोगोचे (बोधचिन्ह) मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
‘साहित्य संमेलन: माझी भूमिका व अपेक्षा’ तसेच ‘या महिन्यातील अशी बोलते माझी कविता, कथा’ या विषयांवर रवींद्र येवले, शांताराम आवटे, सुरेश शिंदे, महादेव गुंजवटे, सुधीर इंगळे, आशा दळवी, श्रेयश कांबळे, अशोक माने, भारतीय जगदाळे, योगेश जगदाळे, अविनाश चव्हाण यांनी आपले साहित्यिक विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक संयोजक ताराचंद्र आवळे यांनी केले, तर आभार सचिव राजेश पाटोळे यांनी मानले.

