दैनिक स्थैर्य । दि. ०९ जुलै २०२२ । मुंबई । ठाणे जिल्हयातील कळवा येथे सामाजिक न्याय विभागामार्फंत बांधण्यात येत असलेल्या सामाजिक न्याय भवन इमारतीच्या अंतिम टप्प्यातील बांधकामाची पाहणी समाज कल्याण आयुक्त, डॉ.प्रशांत नारनवरे यांनी केली. सामाजिक न्याय भवनाचे बांधकाम त्वरीत पूर्ण करून इमारत हस्तांतरणाबाबत संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या.
समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी सामाजिक न्याय विभागामार्फंत बांधण्यात येत असलेल्या कळवा येथील सामाजिक न्याय भवन इमारतीच्या बांधकामाचा प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन आढावा घेतला यावेळी प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण, मुंबई श्रीमती. वंदना कोचुरे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
सामाजिक न्याय विभागामार्फंत राज्यात प्रत्येक जिल्हयात सामाजिक न्याय भवन बांधण्यात येत आहेत. ठाणे जिल्हयातील सामाजिक न्याय भवन हे कळवा या ठिकाणी बांधण्यात येत आहे. हे भवन दोन टप्प्यात बांधण्यात येत असून या सामाजिक न्याय भवनामध्ये विभागातंर्गत येणारी सर्व महामंडळांची कार्यालये, जातपडताळणी कार्यालय, सभागृह, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयांचा समावेश असणार आहे. या भवनाची इमारत चार मजली असून या इमारतीमध्ये 200 मुलींची क्षमता असलेले वसतिगृह सुध्दा बांधण्यात येणार आहे. या भवनाच्या बांधकामासाठी सुमारे 16 कोटींचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आलेला आहे.