सामाजिक न्याय दिन उत्साहात साजरा


दैनिक स्थैर्य । दि. २७ जून २०२२ । सातारा । दि 26 जून हा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिन सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात आला. दि. 26 जून 2022  रोजी सकाळी 8.30 वाजता छत्रपती शाहू बोर्डिंग, पोवईनाका, सातारा येथून समता दिंडी काढण्यात आली. समता दिंडीच्या सुरुवातीस जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपआयुक्त स्वाती इथापे,   समाज कल्याण सहायक आयुक्त नितीन उबाळे,   जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी श्रीमती. मुजावर यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी दीपप्रज्वलन करुन छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याप्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

त्यानंतर जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपआयुक्त स्वाती इथापे यांनी समता दिंडीस हिरवा ध्वज दाखवून मार्गस्थ केले. या प्रसंगी वरिष्ठ अधिकारी / कर्मचारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, नागरीक उपस्थित होते. समता दिंडीमध्ये शहरातील विविध शाळांमधील सुमारे 500 ते 600 शालेय विद्यार्थी सहभागी झाले हेाते. समता दिंडीमध्ये सामाजिक न्याय विभाग, विविध महामंडळे यांच्या योजनांचे चित्ररथ यांनी दिंडीमध्ये सहभागी होऊन दिंडीची शोभा वाढविली. डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे या प्रभृतींना पुष्पहार अर्पण करुन समता दिंडी डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा नगरपालिके जवळ सातारा येथे समाप्त झाली.

दि 26 जून 2022 रोजी सकाळी 10.00 वाजता मुख्य कार्यक्रम धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविदयालय, सातारा येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपआयुक्त स्वाती इथापे,   समाज कल्याण सहायक आयुक्त नितीन उबाळे, पोलीस निरीक्षक   नितीन माने, आनंद वायदंडे व इतर मान्यवर यांचे हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. या कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत पुरस्कार प्रदान करुन गौरविलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. तसेच राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना धनादेश वितरीत करण्यात आले. जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा यांच्यावतीने जात पडताळणी प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. तसेच साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामार्फत बीजभांडवल योजनेतील लाभार्थ्यांना कर्जवाटप करण्यात आले.

या प्रसंगी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनावर सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राध्यापक   निरंजन फरांदे  यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. या प्रसंगी बोलताना त्यांनी बहुजन समाजाच्या उत्थानासाठी राजर्षी शाहू महाराजांनी केलेले कार्य अनन्यसाधारण महत्वाचे असून राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्याय आणि मानवतेची प्रतिष्ठापना केली. यावेळी प्रज्वल मोरे यांनी राजर्षी शाहू महाराजांनी भटक्या-विमुक्त समाजाच्या न्यायासाठी आणि मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी प्रसंगी स्वकीयांचा रोष पत्करला परंतु उपेक्षितांच्या उत्थानाचे कार्य मात्र सोडले नाही, असे विचार  आपल्या मनोगतामध्ये मांडले.

मुख्य कार्यक्रमास पुरस्कार प्राप्त व्यक्ती, विद्यार्थी, पालक, शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शेवटी  समाज कल्याणचे सहायक आयुक्त नितीन उबाळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


Back to top button
Don`t copy text!