तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या; मोदींनी भाजपच्या मेळाव्यात स्पष्टच सांगितलं

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २७ जून २०२३ । भोपाळ । लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपला रोखण्यासाठी देशातील १५ विरोधी पक्षातील नेत्यांनी एकजुटीचा नारा दिला आहे. अलीकडेच बिहारची राजधानी पाटणा येथे विरोधी ऐक्याची बैठक पार पडली. विरोधकांच्या बैठकीवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी विदेश दौऱ्यावर होते. पण, आज मध्य प्रदेशच्या भोपाळ येथील जाहीर सभेला संबोधित करताना विरोधकांच्या एकीवरून मोदींना त्यांना लक्ष्य केले. “पाटण्यातील बैठकीत सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी हातमिळवणी केली”, अशी टीका मोदींनी केली. यावेळी, मोदींनी प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांची नावे घेत त्यांच्यावर निशाणा साधला.

विरोधकांना लक्ष्य करताना मोदी म्हणाले की, पाटणाच्या बैठकीत सर्व भ्रष्टाचाऱ्यांनी हातमिळवणी केली. घोटाळाविरोधी कारवाईतून विरोधी पक्ष पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. भ्रष्ट नेते एकमेकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. मी तुम्हाला हमी देतो की, मी त्यांच्यापैकी कुणालाही सोडणार नाही आणि प्रत्येक घोटाळेबाजावर कारवाई करेन. जर विरोधकांकडे घोटाळे आणि भ्रष्टाचाराची गॅरंटी असेल तर माझ्याकडेही तुम्हा सर्वांसाठी एकच गॅरंटी आहे आणि ती म्हणजे भ्रष्टाचारात सहभागी असलेल्यांना मी सोडणार नाही. आज जेव्हा त्यांच्यावर कारवाई होत आहे, हे पाहून ते एक आले आहेत, असे मोदींनी म्हटले. तसेच, हे सर्वजण त्यांच्या मुला-बाळांचं भलं करण्यासाठी एकत्र आले आहेत, असेही मोदींनी म्हटले.

जर तुम्हाला गांधी परिवाराच्या मुला-मुलींचं कल्याण करायचंय तर काँग्रेसला मत द्या. शरद पवारांच्या मुलीचं कल्याण करायचंय, तर राष्ट्रवादी काँग्रेसला मत द्या. लालू प्रसाद यांच्या मुलांचं भलं करायचंय, तर राजदला मत द्या. मुलायमसिंह यादव यांच्या मुलाचं चांगलं करायचंय तर समाजवादी पार्टीला मत द्या, अब्दुल्ला यांच्या परिवारातील मुलांचं कल्याण करायचंय, तर नॅशनल कॉन्फ्रेन्सला मत द्या. तुम्हाला चंद्रशेखर राव यांच्या मुलीचं भलं करायचंय तर बीआरएचला मत द्या. पण, तुम्हाला तुमच्या कुटुंबातील मुला-मुलींचं भलं करायचंय, त्यांचं कल्याण करायचंय तर तुम्ही भाजपला मत द्या, असं आवाहन करत मोदींनी सर्वच प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्यांवर आणि त्यांच्या मुलांवरही टीका केली.

पाटण्यात जे विरोधक एकवटले होते, त्यांची यादी केली तर सर्व पक्षांनी मिळून एकूण २० लाख कोटी रूपयांचा घोटाळा केला आहे. तसेच एकट्या कॉंग्रेस पक्षाने जवळपास लाखो कोटींचा घोटाळा केला, अशा शब्दांत मोदींनी विरोधकांचा समाचार घेतला. तर, राष्ट्रवादी कॉंग्रेसवर ७० कोटी रूपये घोटाळा असल्याचा आरोप असून त्यांचीही यादी मोठी असल्याचे मोदींनी म्हटले.

दरम्यान, “भाजपची सर्वात मोठी शक्ती म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आहेत. आज या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानतो, याद्वारे मी भाजपच्या सुमारे १० लाख बूथ कार्यकर्त्यांना संबोधित करू शकलो. इतिहासात राजकीय पक्षाचा असा एकही कार्यक्रम आजवर झालेला नाही”, असेही मोदींनी यावेळी म्हटले.


Back to top button
Don`t copy text!