दैनिक स्थैर्य | दि. २९ सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटण शहरात जे भुयारी गटार योजनेचे कामकाज झाले आहे, ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे कामकाज झाले आहे. जर फलटणकरांनी आगामी येणार्या निवडणुकीत आपल्या हातामध्ये सत्ता दिली तर नक्कीच भुयारी गटार योजनेचा हिशोब करू व नक्की कुठे पाणी मुरले आहे, हे फलटणकरांच्या समोर आणू, असे स्पष्ट मत खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिलेल्या पत्रकात व्यक्त केले आहे.
या पत्रकात खासदार रणजितसिंह म्हणाले की, फलटण शहरातील जनतेला अनेक मूलभूत सुविधा मिळताना हाल सोसावे लागत आहेत. शहरात रस्ते व पाणी सुद्धा नीट उपलब्ध होवू शकल्या नाहीत. मी खासदार म्हणून निवडून आल्यापासून शहरातील अनेक विकासकामे मार्गी लावण्यात यश आले आहे. आज २० मिनिटे झालेल्या पावसात फलटण शहरातील भुयारी गटार योजनेचे काम व रस्त्यांचे जे काम झाले आहे; ते कोणत्या दर्जाचे काम झाले आहे, हे कळत आहे.
आगामी येणार्या निवडणुकीमध्ये जनतेने माझ्या ताब्यात नगरपालिका दिल्यास भुयारी गटारात व नगरपालिकेत झालेल्या कामकाजात लक्ष घालून नक्की पाणी कुठे मुरले आहे, हे फलटणकर जनतेच्या समोर आणल्याशिवाय राहणार नाही. शहरातील जनतेला रस्ते, बगीचा, मुलांना खेळण्यासाठी मैदाने, ज्येष्ठ नागरिक व महिलांना सुरक्षितता यासाठी प्रयत्न करायचा आहे, असेही खासदार रणजितसिंह यांनी स्पष्ट केले आहे.