दैनिक स्थैर्य । दि. ३० मार्च २०२३ । मुंबई । कोरोना काळात रुग्णांसाठी ऑनफिल्ड असलेले डॉक्टर आज जयपूरच्या रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. नेहमीच आपल्या रुग्णालयात रुग्णसेवा देणारे डॉक्टर रस्त्यावर उतरुन बुट बॉलिश करत होते, ऊसाचा रस विकत होते तर काहीजण भाजीपाल्याची विक्री करताना दिसून आले. राजस्थानसरकार लागू करत असलेल्या राईट टू हेल्थ विधेयकाला विरोध करत ही डॉक्टर मंडळी रस्त्यावर उतरली होती. जयपूरमधील एसएमएस मेडिकल कॉलेजपासून येथील डॉक्टरांनी विरोध प्रदर्शनाला सुरुवात केली होती. डॉक्टरांनी २ तास रस्त्यावर उतरुन या विधेयकास विरोध केला आहे.
राजस्थानसरकारने आम्हाला कुठेच ठेवलं नाही, जर आमचे हॉस्पीटलच उरले नाहीत, तर आम्ही काय करायचं. आमच्याकडे भाजीपाला विकण्याशिवाय आणि बुटपॉलिश करण्याशिवाय पर्यायच उरणार नाही, असे डॉक्टरांनी म्हटले. मुख्यमंत्री म्हणत आहेत, प्रत्येक रुग्णावर मोफत उपचार करा, पैसे आम्ही देतो. मात्र, ६ महिन्यानंतर त्याचे केवळ १० टक्के रक्कम मिळेल. त्यामुळे, आम्ही हे आंदोलन करत असल्याचं त्यांनी म्हटलं. सरकारविरोधी घोषणाबाजी करत डॉक्टरांनी आपला रोष व्यक्त केला.
आम्ही हॉस्पिटल बंद करू, पण आरटीएच कायदा लागू होऊ देणार नाहीत. राजस्थानमध्ये यापूर्वीच चिरंजीवी योजना सुरू आहे, मग या विधेयकाची गरजच काय, असा सवालही डॉक्टरांनी सरकाला केला आहे. काहीही झालं तर आम्ही माघार घेणार नाही, हे विधेयक होऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, यावेळी, फोर्टीस हॉस्पीटलचे न्यूरोसर्जन डॉ. संकल्प भारतीय यांनी विरोध करताना चक्क रस्त्यावर बसून बुट पॉलिश केले. आरोग्यमंत्री म्हणतायंत की, रुग्णालयांस कुलूप लावा किंवा घरी जावा. पण, हे विधेयक येणारच.