…. तर माढा व साताऱ्याचे खासदार हे फलटणचे असतील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य | दि. 2 डिसेंबर 2023 | फलटण | प्रसन्न रुद्रभटे | गेल्या काही महिन्यांपासून माढा व सातारा लोकसभा मतदारसंघ हा आगामी निवडणुकींमुळे चर्चेत आले आहेत. आता आगामी काळामध्ये जर राजकीय गणिते फिरली तर नक्कीच माढा लोकसभा मतदारसंघ व सातारा लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व हे नक्कीच फलटणचे असतील; अश्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु आहेत. याबाबत घेतलेला सविस्तर आढावा…..

माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर हे विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे महायुती मधील तिकीट हे भारतीय जनता पार्टीकडेच राहण्याची दाट शक्यता वर्तवली जात होती. अशामध्येच माढा लोकसभा मतदारसंघाची जागाही राष्ट्रवादीच्या वाटेला आली नसल्याचे समोर येत आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या शिबिरामध्ये उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी चार लोकसभा मतदारसंघांमधून राष्ट्रवादीचे उमेदवार निवडणूक लढवतील असे जाहीर केले; त्यामध्ये माढा लोकसभा नसल्याने विविध चर्चा पुन्हा सुरू झाल्या आहेत.

त्यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) या पक्षाच्या कर्जत येथे झालेल्या मेळाव्यामधून लोकसभेबाबत बोलताना उपमुख्यमंत्री ना. अजित पवार म्हणाले की; आगामी लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चार जागांवरून म्हणजेच बारामती, सातारा, रायगड व शिरूर या मतदारसंघातून निवडणूक लढवणारच आहे व या सोडून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या असलेल्या जागांच्या बाबत ना. देवेंद्र फडणवीस व ना. एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून त्यामधील सुद्धा काही जागा आपण लढू असे स्पष्ट केले आहे.

गत काही महिन्यांपासून माढा लोकसभा मतदारसंघासाठी जर रणजितसिंह नाईक निंबाळकर हे कोणत्याही पक्षाचे उमेदवार असले तर त्यांना पाडण्यासाठी आपण कार्यरत राहू; असे स्पष्ट उद्गार विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले होते. त्यापूर्वी व त्यानंतर माढा लोकसभा मतदार संघामधून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर किंवा त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) चे तिकीट मिळेल अशा चर्चा राज्यामध्ये घडलेल्या घडामोडीनंतर सुरू होत्या; परंतु यावर उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी पडदा पाडला असल्याचे दिसत आहे.

सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) च्या वतीने विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नावाची चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरू आहे. जर माढा लोकसभा मतदारसंघ ना. अजित पवार यांनी आपल्याकडे घेतला नसला तरी सातारा लोकसभा मतदारसंघामधून श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना रिंगणात उतरवण्याची खेळी ना. अजित पवार खेळू शकतात. सातारा लोकसभा मतदारसंघांमध्ये ना. अजित पवार गटाकडे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्याशिवाय कोणताही सक्षम उमेदवार सद्यस्थितीत दिसून येत नाही.

भारतीय जनता पार्टीचे माढा लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी सुद्धा पुन्हा निवडणुकीला उभे राहण्याचे तयारी सुरू केलेली आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या खासदारकीच्या काळामध्ये हजारो कोटी रुपयांचा निधी मतदार संघामध्ये आणला आहे; पक्षाच्या आदेशानुसार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर सुद्धा पुन्हा माढा लोकसभा लढवू शकतात असे मत व्यक्त केले जात आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजे दिवाळीच्या कालावधीमध्ये मोहिते – पाटील कुटुंबीयांमधील धैर्यशील मोहिते – पाटील यांनी आपण माढा लोकसभा मतदारसंघाची आगामी निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले होते. गेल्या काही वर्षांपासून सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण केले आहे. गत निवडणुकीमध्ये पक्षाला दिलेल्या शब्दानुसार संपूर्ण मोहिते – पाटील कुटुंबियांनी भारतीय जनता पार्टीचा खासदार माढा लोकसभा मतदारसंघावर निवडून आणला होता आगामी काळामध्ये होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण निवडणूक लढवणार असल्याचे धैर्यशील मोहिते – पाटील यांनी स्पष्ट केले होते.

परंतु जर माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली व सातारा लोकसभा मतदार संघामधून विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर किंवा त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली व त्याचे निवडून आले तर फलटण शहरासह तालुक्याला दोन खासदार होतील यामध्ये शंका नाही.

या सर्व बाबींमुळे नक्की माढा लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी कोणत्या पक्षाकडे जाते व नक्की कोणता उमेदवार माढा लोकसभा मतदार संघामधून निवडून येईल; हे आता येणारा काळच ठरवेल.


Back to top button
Don`t copy text!