
दैनिक स्थैर्य । दि. २३ मार्च २०२३ । मुंबई । काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आडनावावरून केलेली टीका महागात पडली आहे. मोदी आडनावावरून अपमान केल्याच्या आरोपाखाली दाखल झालेल्या खटल्यात राहुल गांधींना सुरतच्या न्यायालयाने दोषी ठरविले आहे. या प्रकरणी निकाल देताना न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली. यानंतर लगेचच जामिनही दिला. यानंतर काँग्रेस पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून, केंद्रातील मोदी सरकारवर सडकून टीका करण्यात आली.
…तर मोदींसह अनेक BJP नेते जन्मठेपेत जातील
सचिन सावंत यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये, एखाद्या राजकीय विधानावर दोन वर्षांची शिक्षा केवळ मोदींच्या न्यू इंडियात होऊ शकते……याच कारणामुळे खरे तर मोदींसहित भाजपाचे अनेक नेते जन्मठेपेत जातील, असे ट्विट करत सचिन सावंत यांनी टीकास्त्र सोडले. दुसरीकडे, राहुल गांधी यांच्यावरील कारवाईविरोधात काँग्रेस पक्षाने मुंबईत जोरदार आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध केला. यावेळी काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.राहुल गांधी यांनी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत नीरव मोदी, ललित मोदीसारख्या भ्रष्ट लोकांविषयी एक भूमिका मांडली होती. जनतेचे पैसे लूटून हे मोदी देशाबाहेर पळून गेले हे वास्तव आहे. राहुल गांधी यांच्यावर शिक्षेची झालेली कारवाई ही केंद्र सरकारच्या दबावाखाली झाली आहे. तसेच मोदी सरकार राहुल गांधींचा वाढता प्रभाव पाहून घाबरलेले असून त्या भीतीपोटीच त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला
दरम्यान, काँग्रेस पक्षाचा देशभर वाढता प्रभाव पाहता केंद्रातील सत्ताधारी पक्ष घाबरलेला आहे. या परिस्थितीतूनच विरोधकांवर कारवाई केली आहे. केंद्रातील सत्ताधारी पक्षाच्या दबावतंत्राविरोधात रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही म्हणून काँग्रेसने हे आंदोलन केले आहे, असे अशोक चव्हाण यांनी यावेळी बोलताना सांगितले.