स्थैर्य, खंडाळा, दि. १८ : शिरवळ येथे करोनाने कहर केला असून दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. आज नवीन 2 रुग्णांची भर पडली असून येथील 60 व 43 वर्षीय पुरुष यांचे अहवाल करोना बाधित आले असून शिरवळ येथे बाधित रुग्णांची संख्या 118 वर गेली आहे. करोना रुग्णसंख्या कमी होण्यासाठी तसेच शिरवळसह खंडाळा तालुक्यातून करोना हद्दपार करायचा असेल किंवा घालवायचा असेल तर तालुक्यातील कंपन्या बंद ठेवणे ही काळाची गरज आहे.
जिल्हा प्रशासनाने यात गांभीर्याने लक्ष घालून ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे तसेच सध्याच्या परिस्थितीमध्ये कंपन्यांनी कामगारांचा बंद काळातील पगार कपात करू नये, कंपनीचे होणारे नुकसान कामगार पुढे भरून काढतील. आज रोजी कंपन्या अशाच चालू राहिल्यास करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढण्याची दाट शक्यता आहे आणि बिकट परिस्थिती निर्माण होईल याची शक्यता नाकारता येत नाही. परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी यात लक्ष घालून तालुक्यातील सर्व कंपन्या बंद ठेवणेबाबत तातडीने निर्णय घ्यावेत अशी शिरवळसह तालुक्यातील जनतेची मागणी आहे.