दैनिक स्थैर्य । दि. ११ एप्रिल २०२३ । अकोला । राज्यातील शिवसेना शिंदे गटाचे आमदार, खासदार, नेते यांनी दोन दिवसीय अयोध्या दौरा केला. या दौऱ्यात अयोध्येतील राम मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तर, शरयू नदीकिनारी महाआरतीही केली. यावेळी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेतेही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या अयोध्या दौऱ्याला मंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह आमदार बच्चू कडूंचीही अनुपस्थिती लक्षवेधी ठरली. त्यामुळे, बच्चू कडू नाराज असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या होत्या. आता, आमदार कडू यांनी आपल्या नाराजीबद्दल भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, मुख्यमंत्री शिंदे हे दबंग नेते आहेत, असेही त्यांनी म्हटले.
शिंदे फडणवीस सरकारचे सर्व नेते आमदार व खासदार अयोध्या दौऱ्यावर गेले होते. पण, यात शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू नसल्याने संजय राऊत यांनी बच्चू कडू हे नाराज असल्याचं म्हटलं होतं. त्यावर बच्चू कडू यांनी, मी नाराज नसल्याची प्रतिक्रिया देत स्पष्टीकरण दिलंय. सध्या आमच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याने या कामात मी व्यस्त होतो. त्यामुळे अयोध्या दौऱ्यावर जाऊ शकलो नाही, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कामामध्ये सनी देओल आहेत आणि अॅक्शनमध्ये नाना पाटेकर यांच्यासारखे दबंग आहेत. राज्यात असे दबंग मुख्यमंत्री असल्यामुळे नाराज होण्याचं कारण नाही, असे म्हणत आमदार बच्चू कडू यांनी मुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलंय.