
स्थैर्य, सातारा, दि.२४: ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना करोनाची लागण झाली. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर सोमवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात आले होते. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचे निधन झाले. ‘गेले पाच दिवस त्या साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमधील कोव्हिड अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर होत्या. परंतु, अतिगंभीर संसर्गामुळे त्यांच्या शरीराने उपचारास प्रतिसाद दिला नाही,’ अशी माहिती अतिदक्षता विभागाचे तज्ज्ञ डॉ. संजय साठे आणि हृदयविकारतज्ज्ञ डॉ. सोमनाथ साबळे यांनी दिली. मृत्यूसमयी प्रसिद्ध अभिनेत्री अलका कुबल त्यांच्यासोबत होत्या.
साताऱ्यातील कैलास स्मशानभूमी येथे करोनाचे नियम पाळून आशालता यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. आशालता त्यांच्या घरातल्यांवर काहीशा रागवल्या होत्या. माझं शेवटच सगळं तू आणि समीरनेच करायचं असं देखील त्या म्हणाल्या. त्यांच्या इच्छेचा मान राखून, सरकारी नियमांचे पालन करून आम्ही आज इथे साताऱ्यातच सगळे सोपस्कार आटोपले आहेत, असं अलका कुबल म्हणाल्या.
मराठी चित्रपटसृष्टीत ‘आशालता’ या नावाने त्या ओळखल्या जात होत्या. सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी सध्या अभिनेत्री अलका कुबल यांच्या ‘आई माझी काळूबाई’ या मालिकेचे चित्रीकरण सुरू असून त्यामध्ये आशालता यांची भूमिका असल्याने त्या साताऱ्यात होत्या. चित्रीकरणादरम्यान मालिकेच्या सेटवरील २७ जणांना जणांना करोनाची लागण झाली होती. त्यामध्ये आशालता यांचा समावेश होता. प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात आले होते. सोमवारी त्यांची प्रकृती अधिकच खालावली होती. मंगळवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अनपेक्षित ‘एक्झिट’चा सर्वांनाच जबर धक्का बसला आहे.