कच्च्या लोखंडाच्या वाढत्या किमतीमुळे बंद होण्याच्या मार्गावर लहान प्लँट्स


स्थैर्य, दि.२४: कोरोनाकाळात मोठा फटका सोसणारे पोलाद क्षेत्र जसजसे रुळावर परतत असताना या क्षेत्रावर पुन्हा एकदा संकट घोंगावत आहे. कच्चे लोखंड आणि पोलादाच्या मोठ्या भाववाढीनंतर मोठ्या स्टील कंपन्यांचा नफा कमी होत आहे, तर दुसरीकडे लहान स्टील कंपन्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे अँगल, टीएमटी, मोल्ड, ग्रिल, चॅनल, पत्रा, ऑटो पार्ट्‌स, नट-बोल्ट आणि खिळ्यासारख्या वस्तूंची टंचाई होण्याची शक्यता आहे. उद्योगातील जाणकारांनुसार, लहान स्टील प्लँट्स ६० ते ७० टक्के क्षमतेने काम करत आहेत. कच्च्या लोखंडाच्या किमतीला आळा बसला नाही तर उत्पादन क्षमता ४० टक्क्यांपेक्षाही खाली येऊ शकते आणि मोठ्या संख्येत लहान स्टील प्लँट बंद होण्याच्या मार्गावर आहेत.

देशात छत्तीसगड आणि झारखंडमध्ये सर्वात जास्त लहान पोलाद प्रकल्प आहेत. छत्तीसगडचा देशातील स्टील उत्पादनात चौथा क्रमांक आहे. येथे भिलाई स्टील प्लँटसह जवळपास ६०० हून अधिक स्पंज आयर्न, फर्नेस आणि रोलिंग मिल आहेत. झारखंडमध्ये ५ फर्नेस मिल व स्पंज आयर्न मिल आहेत. छत्तीसगड मिनी स्टील प्लँट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक सुराणा यांच्यानुसार, ओडिशात कच्च्या लोखंडाच्या काही खाणी बंद झाल्याने किमती सतत वाढत आहेत. कच्च्या लोखंडात वाढ आणि निर्यात मागणी वाढल्याने ८ जानेवारीला स्टीलचे भाव ५८,००० प्रतिटनाच्या विक्रमी उंचीवर पोहोचल्या होत्या. आता या ३९,००० रु. प्रतिटनापेक्षा खाली आल्या. असोसिएशनने एनएमडीसी, राज्य व केंद्राला पत्र लिहून कच्च्या लोखंडाच्या वाढत्या किमतीवर अंकुश लावण्याची मागणी केली आहे.

वर्षात तिप्पट वाढले कच्च्या लोखंडाचे भाव
गेल्या वर्षी कच्च्या लोखंडाचा मूळ दर २,५००-२,६०० रु. प्रतिटन होता. आता हा ७,००० रु. प्रतिटनापेक्षा जास्त झाला आहे. यामध्ये रॉयल्टी, जीएसटी, भाडे जोडल्यास कच्चे लोखंड १२,००० रु. प्रतिटनाच्या भावाने मिळत आहे. १४ दिवसांत कच्च्या लोखंडाचा मूळ दर विक्रमी २९% पर्यंत घसरला आहे. – अनिल नचराणी, अध्यक्ष, स्पंज आयर्न मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (छत्तीसगड)

भाव वाढण्याची कारणे
– चीन, व्हियतनाम, नेपाळ आणि श्रीलंकासह अन्य देशांत कच्चे लोखंड आणि लोखंडाच्या निर्यात मागणीत वाढ
– अनेक मोठे सरकारी प्रकल्प ठप्प होणे. सट्टेबाजीही वाढत्या किमतीमागचे एक मोठे कारण आहे.
– लोखंडाचे भाव जास्त झाल्याने रिअल इस्टेट क्षेत्राकडून ऑर्डर मिळत नाही.


Back to top button
Don`t copy text!