दैनिक स्थैर्य । दि. २६ फेब्रुवारी २०२२ । सातारा । सातारा पालिकेच्या वतीने लक्ष्मीटेकडी व भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी येथे उभारण्यात आलेल्या घरकुलांसाठी शुक्रवारी ड्रॉ काढण्यात आला. या माध्यमातून ३१ लाभार्थ्यांना सदनिकांचा ताबा देण्यात आला. हक्काचं घर मिळाल्याने झोपडपट्टीवासीयांनी आनंदोत्सव साजरा केला.
पालिकेच्या वतीने एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी सुधारणा अभियानांतर्गत भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टी व लक्ष्मीटेकडी येथे घरकुलांची उभारणी केली आहे. भीमाबाई आंबेडकर झोपडपट्टीत एकूण ११० घरकूल असून, त्यांचे पाच इमारतीत, तर लक्ष्मीटेकडी येथे ३५२ घरकूल असून, त्यांचे अकरा इमारतीत विभाजन केले आहे. पालिकेने यापूर्वी काही लाभार्थ्यांना ड्रॉद्वारे सदनिकांचा ताबा दिला होता, तर गुरुवारी दुपारी पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात पार पडलेल्या बैठकीत दोन्ही ठिकाणच्या ३१ लाभार्थ्यांना ड्रॉ काढून घरकुलांचा ताबा देण्यात आला. अनेक वर्षांनंतर हक्काचा निवारा मिळाल्याने लाभार्थ्यांनी आनंद साजरा केला.
यावेळी अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले, नगरअभियंता दिलीप चिद्रे, अभियंता अनंत प्रभुुणे, सुधीर चव्हाण यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.