स्थैर्य, सातारा, दि. २९ : पावसामुळे यंदा परळी ते केळवली डांबरी रस्त्याची अक्षरश: चाळण झाली होती. या मार्गाकडे जाणार्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. परळी ते केळवली हा रस्ता ग्रामसडक योजनेअंतर्गत तयार करण्यात आला होता, परंतु कित्येक वर्षांपासून या रस्त्याची डागडुजी न केल्याने रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे तयार झाले होते. प्रवास करताना अनंत अडचणी येत होत्या. काही वेळेला तर छोटे-मोठे अपघात होत होते. मात्र, नित्रळ व कातवडी येथील युवकांनी पुढाकार घेऊन अपघातापासून बचाव व्हावा यासाठी श्रमदानातून रस्त्याची डागडुजी करून प्रशासनाला एकप्रकारे चपराक दिली आहे.
परळी ते केळवली हा रस्ता करोना प्रादुर्भावाच्या आधी मंजूर झाला होता. परंतु कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता काही कामांना स्थगिती देण्यात आली. ग्रामस्थांनी वेळोवेळी लोकप्रतिनिधी तसेच संबंधित प्रशासनाला रस्त्याची नूतनीकरण राहू द्या; पण खड्डे तरी भरा यासाठी अनेक वेळा विनंती केली, परंतु कोणतीही कार्यवाही न झाल्याने मुंबईतील तसेच स्थानिक तरुणांनी श्रमदानातून खड्डे भरून रस्ता सुरळीत करून दिला. दरम्यान, या त्यांच्या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक केले आहे.
यावेळी हर्षल वांगडे, देवांक वांगडे, विशाल वांगडे, अमित वांगडे, विधान भोसले, प्रवीण वांगडे, युवराज वांगडे, शैलेश वांगडे, सुमित वांगडे, आकाश वांगडे, संगम वांगडे, कृणाल वांगडे, संदीप लोटेकर, प्रवीण घाग, शैलेश लोटेकर, गणेश धनावडे, चंद्रकांत लोटेकर सुधीर धनावडे, आकाश लोटेकर, यशवंत घाग आदी तरुणांनी उपक्रमात सहभागी होऊन श्रमदान केले.