ऑनलाईन साधनांच्या आधारे विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


जागतिक युवा कौशल्य दिन साजरा

स्थैर्य, मुंबई, दि. १५ : कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांना विविध कौशल्य प्रशिक्षणे ऑनलाईन साधनांच्या आधारे देता येतील. सलाम बॉम्बे फाऊंडेशनने यासंदर्भात राबविलेला उपक्रम स्तुत्य आहे. राज्य शासनही यासंदर्भात विचार करेल, असे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी आज येथे सांगितले. तसेच राज्याच्या विविध भागात त्या त्या भागांच्या गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षणांचे आयोजन करणे आणि आरोग्य विषयक कौशल्य प्रशिक्षणावर भर देणे यावर या पुढील काळात व्यापक कार्य केले जाईल, असे ते म्हणाले.

जागतिक युवा कौशल्य दिन आज विविध ऑनलाईन कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. त्यावेळी श्री.मलिक बोलत होते.

सलाम बॉम्बे फाऊंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ बॉम्बेच्या वतीने प्रशिक्षणार्थींना मोबाईल टॅबलेट वितरणाचा ऑनलाईन शुभारंभ करण्यात आला. त्याचबरोबर स्किल डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्या वतीने ऑनलाईन वेबिनार तसेच कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत फेसबूक आणि युट्यूब लाईव्हद्वारे राज्यभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यात आला.

विद्यार्थ्यांना टॅब वितरणाचा शुभारंभ

सलाम बॉम्बे फाऊंडेशनमार्फत गरीब विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांसाठी ब्युटी आणि वेलनेस, विविध घरगुती उपयोगाच्या वस्तुंची दुरुस्ती, मोबाईल रिपेरिंग, बेकरी उत्पादने, ज्वेलरी डिझाईन, माध्यमे, करमणूक आणि क्रीडाविषयक अशी विविध कौशल्य प्रशिक्षणे दिली जातात. सध्या विद्यार्थ्यांना ही प्रशिक्षणे ऑनलाईन दिली जातात. या प्रशिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल फोन नाही अशा विद्यार्थ्यांना मदत व्हावी यासाठी रोटरी क्लब ऑफ बॉम्बेमार्फत विद्यार्थ्यांना टॅबलेट देण्यात येत आहेत. आज वेबिनारमध्ये या टॅब वितरणाचा मंत्री नवाब मलिक, कौशल्य विकास आयुक्त दिपेंद्रसिंह कुशवाह, रोटरी क्लब ऑफ बॉम्बेचे अध्यक्ष फ्रामरोझ मेहता, सलाम बॉम्बे फाऊंडेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नंदीना रामचंद्रन, उपाध्यक्ष गौरव अरोरा यांच्या हस्ते प्रातिनिधीक शुभारंभ करण्यात आला.

त्यानंतर सांगली येथील स्किल डेव्हलपमेंट फाऊंडेशन यांच्यामार्फत राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन वेबिनार संपन्न झाला. दुपारी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत झालेल्या फेसबूक आणि युट्यूब लाईव्हमध्ये प्रशिक्षणार्थी व संस्थांचा ऑनलाईन गौरव करण्यात आला.

स्थानिक गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षणे

मंत्री मलिक म्हणाले की, राज्यातील विविध भागात विविध प्रकारच्या कौशल्यांची गरज आहे. त्या त्या भागात स्थानिक गरजेनुसार कौशल्य प्रशिक्षणांचे नियोजन करण्यात आले आहे. राज्यातील आयटीआयचे टाटा टेक्नॉलॉजीच्या सहयोगातून आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आयटीआयमध्ये रुपांतरण करण्यात येत आहे. यासाठी साधारण १२ हजार कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राज्यात एकही तरुण कौशल्य प्रशिक्षणाशिवाय किंवा रोजगाराशिवाय राहणार नाही यासाठी कौशल्य विकास विभाग व्यापक कार्य करेल, असे त्यांनी सांगितले.

आरोग्यविषयक कौशल्य प्रशिक्षणावर भर

तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज लक्षात घेता यासंदर्भातील कौशल्य प्रशिक्षणावर यापुढील काळात अधिक भर देण्यात येईल, असेही मंत्री मलिक यांनी यावेळी सांगितले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!