दैनिक स्थैर्य । दि. २९ जून २०२३ । मुंबई । महिला आणि मुलांना कौशल्य विकासाच्या अधिक चांगल्या संधी मिळाव्यात या हेतूने कन्सोर्टियम फॉर टेक्निकल एज्युकेशन (सीटीई) आणि महाराष्ट्र सरकारचे महिला व बाल विकास आयुक्तालय यांनी एका सामंजस्य करारान्वये सहयोग साधला आहे. अधिक उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी आवश्यक मौल्यवान कौशल्ये पुरविणे हे या सहयोगाचे लक्ष्य आहे. या भागीदारीतून सीटीईने डेव्हिड ससून इंडस्ट्रियल स्कूल, मुंबई, महाराष्ट्र येथे माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यासाठी समर्पित एका लर्निंग स्कूलची यशस्वी स्थापना केली आहे. या लर्निंग सेंटरमध्ये विद्यार्थ्यांच्या अधिक मोठ्या गटाला प्रात्यक्षिकांसहित संगणक प्रशिक्षणाचा अनुभव मिळण्यास मदत होणार आहे.
डेव्हिड ससून इंडस्ट्रियल स्कूलच्या इयत्ता १ली ते ९वीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाशी आणि टेक्नोस्कूलकडून पुरविण्यात येणाऱ्या पुस्तकांशी मेळ साधणारे सर्वांगीण प्रशिक्षण दिले जात आहे. टेक्नोस्कूल ही भारतभरातील शाळांना संगणकाचे शिक्षण पुरविणारी अग्रगण्य संस्था आहे, जी शालेय शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर शिकविल्या जाणाऱ्या अद्ययावत माहिती व संपर्क तंत्रज्ञान अभ्यासक्रमाची तंत्रज्ञानाशी सहजतेने सांगड घालून देते. या पॅकेजमध्ये सर्व शैक्षणिक पद्धतींना पुरक स्त्रोत साहित्यासोबत एका आगळ्यावेगळ्या आणि आपली उपयुक्तता सिद्ध केलेल्या कार्यपद्धतीचा समावेश आहे.
सीटीईचे संचालक के. ए. अलागारसामी या सहयोगाबद्दल उत्साह व्यक्त करताना म्हणाले, “महाराष्ट्र सरकारच्या महिला आणि बाल विकास आयुक्तालयाशी झालेल्या आमच्या या भागीदारीच्या माध्यमातून प्रगत तंत्रज्ञान अभ्यासक्रम उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांच्या कौशल्यात सुधारणा घडवून आणण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. देशभरातील विद्यार्थ्यांसाठी कौशल्यसंचाची बांधणी व या कौशल्यांचा विस्तार करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेचा भाग म्हणून आम्ही डेव्हिड ससून इंडस्ट्रियल स्कूल येथे एका कुशल प्रशिक्षकाची नेमणूक केली आहे व अधिकाधिक विद्यार्थ्यांना मोलाच्या तंत्रज्ञानात्मक माहितीने सुसज्ज करण्याचे आपले लक्ष्य साधण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले आहे.”
सीटीईचे मुख्य धोरण अधिकारी श्री. साईरामन श्रीनिवासन म्हणाले, “वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या पावलाशी पावले जुळवून पुढे जायचे तर आपल्याला आजन्म शिकण्याची प्रक्रिया आत्मसात केली पाहिजे. आपली तंत्रज्ञान विषयाला समर्पित लर्निंग सेंटर्स आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा समावेश असलेले अभ्यासक्रम यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची कौशल्यवृद्धी करणे आणि भविष्यासाठी सुसज्ज बनणे हे आमचे लक्ष्य आहे. या भागीदारीमुळे आम्हाला आमच्या प्रकल्पाचा आवाका वाढविणे आणि अधिक मोठ्या गटावर प्रभाव टाकणे शक्य झाले आहे.”