दैनिक स्थैर्य । दि. २१ जून २०२३ । मुंबई । कौशल्य विकास उपक्रम हा ग्रामीण भाग केंद्रित असायला हवा. ग्रामीण भागातील युवकांना कुशल बनवण्याची गरज असून यातूनच ग्रामीण भागातील स्थलांतर कमी होईल आणि घरोघरी कौशल्य पोहोचेल, असे प्रतिपादन कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले आहे.
सीआयआय बिझनेस २० अंतर्गत चौथ्या औद्योगिक क्रांतीसाठी कार्यशक्ती गटाच्या परिषदेत मंत्री श्री. लोढा बोलत होते.
उद्योग सहकार्य आणि व्यावहारिक शिक्षणामुळे कर्मचाऱ्यांमध्ये परिवर्तन होईल, अशी अपेक्षा श्री. लोढा यांनी यावेळी व्यक्त केली.
महाराष्ट्रात एक हजारहून अधिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) असून तिथे देशातल्या सर्वाधिक सुमारे अडीच लाख युवकांना प्रशिक्षण दिले जात असल्याचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांनी यावेळी सांगितले. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गासाठी विशेष कार्यक्रम राबवले जात असून देशातील स्टार्टअपच्या संख्येत महाराष्ट्र आघाडीवर असल्याचेही त्यांनी सांगितले.
सीआयआय पश्चिम विभागाचे अध्यक्ष आणि टाटा पॉवर कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीर सिन्हा म्हणाले की, उद्योगाने अकुशल कामगारांपर्यंत पोहोचून एक कौशल्य व्यासपीठ तयार करणे आवश्यक आहे. ज्यामुळे एकूण उत्पादकता वाढेल. सीआयआय बिझनेस २० उपक्रमाचा एक भाग म्हणून, कामाचा गतिशील मार्ग तयार करण्यासाठी आम्ही भविष्यातील कामांचा आराखडा तयार करत असून त्यामध्ये व्यापक कार्य करत आहोत.
असेंचर इंडियाच्या चेअरमन आणि वरिष्ठ व्यवस्थापकीय संचालक रेखा मेनन म्हणाल्या की, मानव आणि तंत्रज्ञान यांच्यातील सहजीवन संबंधांची गरज आहे. इंडस्ट्री सहयोग, डेटा आधारित मनुष्यबळ विश्लेषण आणि महिलांचा सहभाग वाढवून कौशल्य वाढवले जाईल, असेही त्या म्हणाल्या.