दैनिक स्थैर्य । दि.०३ डिसेंबर २०२१ । खटाव । खटाव तालुक्यात बुधवारी रात्री झालेल्या जोरदार पावसाने झोडपल्याने तीन गावातील साठपेक्षा अधिक लहान-मोठ्या शेळ्या-मेंढ्यांचा मृत्यु झाल्याची दुर्घटना घडली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, बुधवारी दुपारपासूनच खटाव तालुक्यात रिमझीम पाऊस सुरु होता. रात्री 12 नंतर या पावसाने चांगलाच कहर केला. गुरुवारी पहाटेपर्यंत जोरदार पाऊस सुरु होता. या पावसाच्या तडाख्यात लोणी येथील सेवानिवृत्त केंद्रप्रमुख श्रीमंत शिंदे यांच्या शेतात बसलेल्या रामचंद्र नामदेव चव्हाण यांच्या सुमारे 40 मेंढ्या दगावल्या. वरुड येथे श्री. मोरे यांच्या कळपात वांझोळी येथील तानाजी मोटे यांच्या वाड्यातील सुमारे 12 ते 13 मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. तर वाकेश्वर येथील नामदेव पंढरीनाथ राऊत यांच्या भवानी शेतात मेंढ्यांचा तळ होता. या तळातील सुनिल आप्पा साठे यांच्या दोन, सुखदेव तुकाराम गुजले यांच्या पाच व हरीदास बाजीराव मदने यांच्या चार मेंढ्या दगावल्या आहेत. वरुड, लोणी येथील मृत मेंढ्यांची पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खाडे, डॉ. प्रकाश बोराटे यांनी पाहणी करुन शवविच्छेदन केले. यावेळी गांवकामगार तलाठी श्री. काटकर, युवा कार्यकर्ते लालासाहेब माने, सोसायटीचे माजी चेअरमन सदाशिव माने, ज्ञानेश्वर शिंदे आदी उपस्थित होते. मृत मेंढ्या मालकांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.