दैनिक स्थैर्य | दि. 06 सप्टेंबर 2023 | फलटण | भारतीय जनता पार्टीच्या नेत्या तथा राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे या सध्या शिवशक्ती परिक्रमा करीत आहेत. शिवशक्ती परिक्रमादरम्यान पंकजा मुंडे ह्या फलटण मधून शिखर शिंगणापूर कडे मार्गस्थ होत असताना चोरट्यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये तब्बल 16 तोळे लंपास केले असल्याची घटना फलटणमध्ये घडली आहे. यामुळे फलटण पोलिसांच्या बाबत विविध चर्चा सोशल मीडियावर रंगू लागलेल्या आहेत.
भारतीय जनता पार्टीच्या नेत्या व राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे ह्या जेजुरी येथील खंडेरायाचे दर्शन घेऊन शिखर शिंगणापूर कडे फलटण मार्गे मार्गस्थ झाल्या. फलटण येथे भारतीय जनता पार्टीच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या वतीने नाना पाटील चौक येथे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनाद होता. पोलीस बंदोबस्तामध्ये चोरट्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या गळ्यामधील चेनवर डल्ला मारल्याने नक्की पोलीस बंदोबस्त कशासाठी होता ? व काय काम करत होता ? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे.
चोरट्यांनी सांगवी ता. फलटण येथील महादेव कदम यांच्या गळ्यातील साडेदहा तोळ्यांची चैन, डॉ. सुभाष गुळवे यांची चार तोळ्यांची सोन्याची चेन व पत्रकार पोपट मिंड यांची एक तोळ्याची चेन असा एकूण सुमारे सोळा तोळ्यावर डल्ला मारला असून या चोरीने फलटण मध्ये एकच खळबळ उडाली आहे. जर राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या किंवा माजी मंत्र्यांच्या कार्यक्रमांमध्ये अशा चोऱ्या होत असतील तर स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नेमके करायचे काय ? असा प्रश्न सुद्धा उपस्थित राहत आहे.
दरम्यान या चोरीबाबत अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसून रात्री उशिरापर्यंत त्या चोरांची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध सुरू आहे. दरम्यान या शिवशक्ती यात्रेतील चोरीने फलटण तालुक्यात सर्वसामान्य लोकांना चोरांचा त्रास होताच पण आता नेत्यांच्या यात्रेतील लोकांना ही या चोऱ्यांचा फटका बसला आहे.