फलटणमधील ६ माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण


स्थैर्य, फलटण, दि. २० ऑक्टोबर : ज्येष्ठ नेते भीमदेव बुरुंगले यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आता फलटण नगरपालिकेतील आणखी सहा माजी नगरसेवकही लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांकडून मिळत आहे. येत्या दहा दिवसांत, म्हणजेच २७ किंवा २८ ऑक्टोबरच्या सुमारास हा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात असून, या वृत्ताने फलटणच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काही दिवसांपूर्वीच, राजे गटाचे ज्येष्ठ नेते मानले जाणारे भीमदेव बुरुंगले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. हा पक्षबदल ताजा असतानाच, आता थेट सहा माजी नगरसेवक त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवारांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार असल्याची बातमी समोर येत आहे. जर हे वृत्त खरे ठरले, तर आगामी नगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हा मोठा धक्का मानला जाईल.

हे सहा नगरसेवक कोण आहेत, याबाबत अद्याप गुप्तता पाळली जात असली तरी, त्यांच्या संभाव्य पक्षबदलाच्या चर्चांनी शहरात जोर पकडला आहे.

‘स्थैर्य’ या वृत्ताला अधिकृत दुजोरा देत नसले तरी, फलटण शहराच्या राजकीय वर्तुळात या संभाव्य पक्षप्रवेशाबद्दल दबक्या आवाजात जोरदार चर्चा सुरू असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी खासगीत या विषयावर बोलत असून, या सहा नगरसेवकांच्या नावांबद्दल तर्कवितर्क लावले जात आहेत.

जर या सहा नगरसेवकांनी खरोखरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर फलटण नगरपालिकेतील राजकीय समीकरणे लक्षणीयरीत्या बदलू शकतात. अजित पवार गटाची ताकद यामुळे वाढेल. आगामी काळात या चर्चांमध्ये किती तथ्य आहे, हे स्पष्ट होईलच, मात्र तोपर्यंत फलटणचे राजकीय वातावरण तापलेले राहणार हे निश्चित.


Back to top button
Don`t copy text!