सहकार विभागाचे सहा अधिकारी न्यायालयीन चौकशीच्या फेऱ्यात – माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांची माहिती

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०२ मार्च २०२२ । सातारा । रविवार पेठ सातारा येथील जयभवानी नागरी सहकारी पतसंस्था गेल्या एक वर्षापासून बेकायदेशीर रित्या बंद असून येथे 35 लाख रुपयांचा अपहार झाला आहे. पतसंस्थेचे चेअरमन विलास आंबेकर व तत्कालीन जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर यांच्यासह चार शासकीय अधिकाऱ्यांची संगनमताने आर्थिक अनियमिततेचे प्रकरण दडपणे या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. सातारा शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास एक महिन्यात सादर करावयाचा आहे, अशी माहिती माजी उपनगराध्यक्ष शंकर माळवदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. माजी नगरसेवक विलास आंबेकर यांच्या जयभवानी नागरी सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक अनियमिततेची त्यांनी कागदपत्रांच्या आधारे पोलखोल केली.

ते पुढे म्हणाले, तत्कालीन जिल्हा उपनिबंधक प्रकाश अष्टेकर, जिल्हा विशेष लेखापरिक्षक विजय सावंत, विभागीय सहनिबंधक श्रीकृष्ण वाडेकर, लेखापरिक्षक अनिता अटक, आणि लिपिक उन्नती मोटे यांनी जयभवानी पतसंस्थेचे चेअरमन विलास आंबेकर यांच्याशी संगनमत करून 35 लाख रुपयांच्या आर्थिक अनियमिततेचे प्रकरण परस्पर दडपले. या प्रकरणी मी 25 जून 2018 मध्ये मी जिल्हा उपनिबंधकाकडे तक्रार दाखल केली होती. गैरव्यवहाराचे परीक्षण करणाऱ्या अनिता अटक पुर्नलेखा परिक्षणाच्या नियुक्तीसाठी विलास आंबेकर यांनी लेखी हरकत घेतली. विभागीय सहनिबंधकाकडे तक्रार दाखल केल्यावर अष्टेकर यांनी आपले पूर्वीचे आदेश रद्द करून पुन्हा रानडे यांची लेखापरिक्षणासाठी नियुक्ती केली. या प्रकरणात चेअरमन व सहकार विभागाचे अधिकारी यांनी प्रोसेडिंगमध्ये परस्पर ठराव घुसडणे, बेकायदेशीर सभेचे ठराव तयार करणे व कर्जप्रकरणाची कागदपत्र नष्ट करणे यासारखे गंभीर प्रकार घडविले आहेत. 22 जुलै 2020 रोजी शहर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून सुद्धा कोणतीच कारवाई न झाल्याने जिल्हा न्यायालयात आपण खाजगी फौजदारी खटला दाखल केला. जिल्हा उपनिबंधक अष्टेकर यांच्या सह पाच सहकार विभागाचे अधिकारी व पतसंस्था चेअरमन विलास आंबेकर यांची सखोल चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश तिसरे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी दिले आहेत. जयभवानी नागरी सहकारी पतसंस्थेचे 868 सभासद असून गेले वर्षभर ही पतसंस्था बेकायदेशीर रित्या बंद आहे. संस्थेची उलाढाल एक कोटी 25 लाखाच्या घरात असून सव्वाकोटीचे कर्जवाटप आहे. आंबेकर यांचे सर्व नातेवाईकच संचालक मंडळाचे सदस्य असून त्यातील काहींनी राजीनामा दिला आहे. तर काही मयत झाले आहेत. जयभवानी पतसंस्थेच्या अपहार प्रकरणाची तड लावण्याचा इशारा माळवदे यांनी दिला आहे.


Back to top button
Don`t copy text!