दैनिक स्थैर्य । दि. १८ मे २०२२ । सातारा । सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी निसराळे (ता.सातारा) येथील विकास दत्तात्रय जाधव (वय.२८) या युवकाला सहा महिन्यांची सक्तमजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली.३ रे तदर्थ जिल्हा न्यायाधीश श्री.आर के.राजेभोसले सो।यांनी ही शिक्षा सुनावली.
याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोरोना काळात १९ एप्रिल २०२० रोजी बोरगाव पोलीस ठाण्याचे हवालदार राहुल भोये हे देशमुखनगर येथे कर्तव्य बजावत होते. यावेळी ते वाहन चेकिंग करत असताना एका दुचाकीवरून ट्रिपल सीट प्रवास करत असल्याचे पाहून त्यांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला. मात्र दुचाकी चालक तसाच पुढे निघून गेला. संशय आल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला थांबविले. यावेळी पोलिस अधिक चौकशी करत असताना दुचाकीस्वार विकास दत्तात्रय जाधव याने ‘ तू कोण आम्हास विचारणार ‘ असे म्हणून पोलिसांशी हुज्जत घातली. याची फिर्याद हवालदार राहुल भोये यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला होता.
या घटनेचा अधिक तपास सपोनि डॉ.सागर वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळींबकर यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. हा खटला ३ रे तदर्थ जिल्हा न्यायाधीश श्री.आर.के.राजेभोसले यांच्या यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्फे अँड.महेश उमाकांत शिंदे यांनी काम पाहिले. सरकार पक्षातर्फे सहा साक्षीदार तपासण्यात आले. परिस्थितीजन्य पुरावा व अन्य साक्षीदारांनी दिलेल्या साक्षीवरून न्यायालयाने विकास दत्तात्रय जाधव याला ६ महिने सक्तमजुरी व ५०० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. पैरवी अधिकारी म्हणून बोरगाव पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस सुनीता देखणे यांनी परिश्रम घेतले. त्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ,पोलीस प्रोसिक्युशन स्कोर्डचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र यादव,हवालदार शमशुद्दीन शेख,गजानन फरांदे,रेहेना शेख,राजेंद्र कुंभार.अश्विनी घोरपडे,अमित भरते यांनी मदत केली.