

स्थैर्य, पाटण, दि. 17 : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पावसाची संततधार सुरूच असून शिवाजीसागर जलाशयात येणारी पाण्याची आवक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. सोमवारी सकाळी प्रतिसेकंद 1 लाख 14 हजार 980 क्युसेसवर पाण्याची आवक पोहोचल्याने जलपातळी नियंत्रित राखण्यासाठी रविवारपासून 10 फुटांवर उचलण्यात आलेले कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे सोमवारीही जैसे थे स्थिर ठेवण्याचा निर्णय धरण व्यवस्थापनाने घेतला आहे. मात्र, कोयना नदी पात्रात सुरू असलेला पाण्याचा विसर्ग प्रतिसेकंद 2 हजार क्युसेसने वाढवून हा विसर्ग प्रति सेकंद 56 हजार 431 क्युसेकस इतका करण्यात आला आहे. त्यामुळे कोयना नदीवरील मेंढेघर, नेरळे, जुना संगमनगर धक्का पूल, मूळगाव व निसरे फरशी पूल पाण्याखाली गेल्याने नदीपलीकडील गावांचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान हवामान खात्याने येत्या 4 दिवसात 20 तारखेपर्यंत पुणे, कोकणसह सातारा जिल्ह्यात अतिवृष्टीच्या इशारा दिल्याने सातारा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी केला आहे.
कोयना धरणातील पाण्याचा विसर्ग व मुसळधार पाऊस यामुळे कोयना, केरासह सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून काही ठिकाणी कोयना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अतिवृष्टीला सुरवात झाल्यास कोयना व कृष्णा या नद्यांच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ होऊन या नद्याकाठच्या गावांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पाटण, कराड व सांगली परिसरातील कोयना व कृष्णा काठच्या गावांना महापुराचा धोका वाढला आहे. परिणामी या परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
गेल्या आठवड्यापासून कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढल्याने कोयना धरणात सध्या 92.81 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 12 टीएमसी पाण्याची गरज आहे. पाणलोट क्षेत्रात कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक वाढू लागल्याने धरणातील निर्धारित पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी रविवारी सकाळी 8.30 वाजल्यापासून धरणाचे 6 वक्र दरवाजे पहिल्यांदा पावणे दोन पुन्हा 4, 6, 7 व नंतर 10 फुटांपर्यंत उचलून धरणातून प्रतिसेकंद 68 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पावसाचा जोर सोमवारी दिवसभर कमी होऊन विसर्ग कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्याने सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत धरणात प्रतिसेकंद 1 लाख 14 हजार 980 क्युसेस पाण्याची आवक सुरू असल्याने धरणाचे दरवाजे जैसे थे 10 फुटांवरच स्थिर ठेवण्याचा निर्णय कोयना सिंचन विभागाने घेतला. त्यानुसार कोयना नदी पात्रात प्रति सेकंद 56 हजार 431 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. पावसाचा जोर वाढत असल्याने कोयना धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे कोयना प्रशासनाला चांगलीच कसरत करावी लागत आहे.
पाटण शहर जलमय
दरम्यान, कोयना पाणलोट क्षेत्रासहित संपूर्ण पाटण तालुक्यात संततधार पाऊस कोसळत असल्याने आणि धरणातून सोडण्यात आलेला पाण्याचा विसर्ग यामुळे कोयना नदी दुथडी भरून वाहत आहे. त्याची फुगी ओढ्यांच्या माध्यमातून पाटण शहरात आल्याने पाटण शहरातील नवीन बसस्थानक परिसर, धांडे पूल परिसरात पुराचे पाणी शिरले आहे. परिसरातील दुकानांमध्ये पाणी शिरल्याने अनेकांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. दुकानात पाणी शिरल्याने दुकानातील साहित्य हलवण्याची तारांबळ उडाली आहे तर शहराची स्मशानभूमी व परिसरातील भात गिरणीही पाण्याखाली गेली आहे. शहरातील मार्केट यार्ड परिसरातील काही घरांच्या उंबरठ्याला पाणी लागल्याने तेथील 13 लोकांना पाटण नगरपंचायतीमार्फत कै. ज्ञानोजीराव साळुंखे हायस्कूलमध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे.
दरम्यान, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी 8 ते सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत कोयनानगर येथे 113 मि.मी. (3565), नवजा 90 (4040), महाबळेश्वर 50 (3956) मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली आहे. पश्चिम घाटातील पर्जन्यक्षेत्रातही पर्जन्यवृष्टी सुरूच असून प्रतापगड येथे 44 (3506), सोनाट 35 (2914), बामणोली 20 (2506), काठी 73 (2519) मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
कोयना नदीवरील या पुलांना मिळाली जलसमाधी
धरणातून सुरू केलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे कोयना नदीवरील पाटण तालुक्यातील मेंढघर, जुना संगमनगर धक्का पूल, मूळगाव, निसरे फरशी हे पूल दोन दिवसांपूर्वीच पाण्याखाली गेले असताना आज सोमवारी नेरळे पुलावरही पाणी आल्याने नदीपलीकडील मोरगिरी विभागाचा पाटणशी संपर्क तुटला. त्यामुळे नदीपलीकडील गावांची वाहतूक नवारस्ता मार्गे वळविण्यात आली आहे.
आवक 2.13 टीएमसी, वाढ मात्र अर्धा टीएमसी
कोयना पाणलोट क्षेत्रात कोसळणार्या पावसामुळे सोमवारी सकाळी 8 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंतच्या केवळ 8 तासात कोयना धरणात 0.52 टीएमसी पाण्याची आवक झाली. यापैकी 2.13 टीएमसी इतकी वाढ धरणाच्या पाणी पातळीत झाली असून बाकीचे 1.61 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याची माहिती कोयना सिंचन विभागाने दिली.
पाणी पाहण्यासाठी शहरात गर्दी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाटण शहरात 19 तारखेपर्यंत लॉकडाउन असताना जनतेला कोरोनाबाबत कसलेच गांभीर्य नसल्याचे पहावयास मिळाले. धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कोयना, केरासह इतर नद्यांना पूर आला असून तो पाहण्यासाठी पाटण शहरातील नागरिकांनी आपल्या कुटुंबांसोबत मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे पहावयास मिळाले.

