
पाटण – कोयना नदीचे पाणी कराड चिपळूण रस्त्यावर असे वाहत होते
स्थैर्य, सातारा, दि. 20 ऑगस्ट : कोयना धरणातून वाढलेला विसर्ग आणि मुसळधार पावसाचा तडाखा यामुळे हेळवाक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. गावातील मुख्य रस्त्यांसह अनेक घरांच्या आवारात पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. गावातील काही भाग जलमय झाल्याने दळणवळण विस्कळीत झाले असून ग्रामस्थांनी सुरक्षित ठिकाणी हलवण्याची धावपळ सुरू केली आहे. पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाऊस वाढल्यामुळे धरणातील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज दि. 19 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे 8 फुटांवरून 9 फुटापर्यंत उघडून 65,600 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात आला आहे. कोयना धरण पायथा विद्युतगृहाचे दोन्ही युनिट सुरू असून त्याद्वारे 2100 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.कोयना नदीमध्ये एकूण 67,700 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासन सतर्क असून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. नागरिकांनी अनावश्यक धोकादायक ठिकाणी न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.
हेळवाक गावात नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ
मुसळधार पावसासह कोयना धरणातून वाढवलेला पाण्याचा विसर्ग यामुळे कोयना नदीने धोकादायक स्वरूप धारण केले आहे. नदीपात्र दुथडी भरून वाहत असून कोयना विभागातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे.
हेळवाक गावात नदीचे पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली असून प्रशासनाने 5 घरे व 14 दुकाने सुरक्षित स्थळी हलवली आहेत. महादेववाडीतील 4 घरे तसेच हुंबरळी गावातील तब्बल 246 नागरिकांचे स्थलांतर सुरू आहे. या सर्वांना कोयनानग येथील करमणूक केंद्र, मराठी शाळा व नेताजी सुभाषचंद्र हायस्कूल येथे हलविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, हेळवाक येथे कराड-चिपळूण राज्य मार्गावर मोठ्या प्रमाणावर पाणी आल्याने हा महत्त्वाचा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. परिणामी कोकण-पश्चिम महाराष्ट्रातील संपर्क तात्पुरता खंडित झाला आहे. पूरस्थिती गंभीर होत असल्याने प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन पथके युद्ध पातळीवर काम करत आहेत.पावसाचा जोर कायम राहिल्यास आणि धरणातील विसर्ग वाढल्यास परिस्थिती आणखी धोकादायक बनू शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे.