ऑक्सिजन गळती पूर्णत: थांबली असल्याने परिस्थिती नियंत्रणात : कृषिमंत्री दादाजी भुसे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, नाशिक, दि.२२: डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टॅंकच्या गळतीमुळे घडलेली घटना अतिशय दुःखद व मन हेलावणारी आहे. या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी इतर रूग्णालयांच्या ऑक्सिजन प्रकल्पांची तपासणी करण्यात येऊन, तांत्रिक बाबींची पडताळणी केली जाईल, आता ऑक्सिजन गळती पूर्णत: थांबली असल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले आहे.

आज नाशिक महानगरपालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन टॅंक गळतीच्या  घटनास्थळी कृषिमंत्री श्री. भुसे यांनी भेट देऊन पाहणी केली, त्यावेळी मंत्री श्री. भुसे बोलत होते. याप्रसंगी महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आवेश पलोड, डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री श्री. भुसे म्हणाले, मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केल्यानुसार या घटनेची उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी करण्यात येणार असून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात येईल. तसेच या रुग्णालयात घडलेली घटना अतिशय दुःखद असून या दुर्घटनेत मृत पावलेल्या रुग्णांच्या वारसांना राज्य शासनच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असल्याची माहिती कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.

यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी रुग्णालयाची पाहणी केली. यानंतर महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी चर्चा करून घटनेची सविस्तर माहिती घेतली. रुग्णालयातील इतर रुग्णांना चांगले उपचार मिळतील यासाठी यंत्रणा शर्थीचे प्रयत्न करीत असून आता ऑक्सिजन गळती पूर्णतः थांबली असल्याने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी सांगितले.


Back to top button
Don`t copy text!