विधिमंडळ सदस्यांना दिलेल्या धमकीबाबत एसआयटीद्वारे चौकशी करणार – गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. २४ डिसेंबर २०२१ । मुंबई । पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना समाजमाध्यमाद्वारे आलेल्या धमकीच्या घटनेवर कारवाई करण्यात आली असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करण्यात येणार आहे. भविष्यात विधिमंडळ सदस्य अथवा सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेला महत्त्व देऊन अशा घटनांना आळा बसण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा सदस्य सुनिल प्रभु यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना व्हॉट्सॲपद्वारे धमकी आल्याची माहिती सभागृहाच्या निदर्शनात आणून दिली. विधानसभा सदस्यांना अनेकदा अशा धमक्या देण्यात येतात यावर कडक कारवाई होऊन भविष्यात अशा घटना घडू नये याकडे त्यांनी लक्ष वेधले.

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कर्नाटकातील बंगलोर येथील जयसिंग राजपूत या आरोपीने धमकी दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले असून, त्याला अटक करण्यात आली आहे. राज्यातील प्रत्येक नागरिकाचे आयुष्य महत्त्वाचे असून, या घटनेची चौकशी विशेष तपास पथकाद्वारे करण्यात येणार असल्याचे त्यांनी निवेदनात सांगितले. अशा घटना भविष्यात घडू नये यासाठी उपाययोजना करण्यासाठी सर्वंकष धोरण तयार करण्यात येणार असल्याची माहितीही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

याप्रकरणी अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक, सदस्य सर्वश्री नाना पटोले, सुधीर मुनगंटीवार यांनी चर्चेत सहभाग घेतला.


Back to top button
Don`t copy text!