दैनिक स्थैर्य । दि. २२ डिसेंबर २०२१ । फलटण । अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, फलटणच्या सभासदांनी सासवड येथे मोठ्या उत्साहात गायनाचा कार्यक्रम सादर केला. ‘आनंदाचे डोही आनंद तरंग….. मल्हारीची वारी’ या आणि यासारख्या अनेक रचना सादर करीत फलटणमधील येथील दत्तात्रेय चरेगावकर भजनी मंडळाने सासवडच्या श्री संत सोपानदेव मंदिरात दिनांक ११ डिसेंबर रोजी भजन व गायन सेवा सादर केली.
यामध्ये भजन, अभंग, भारुड, गोंधळ गीते सादर करून मंडळाने उपस्थितांचे कान तृप्त केले. श्रावण महिन्यात गोकुळ अष्टमीला मोठा उत्सव साजरा करणाऱ्या या भजनी मंडळाने यापूर्वी बुध, सेवागिरी मठ पुसेगाव या ठिकाणी तसेच सातारा आकाशवाणी केंद्रावर अशा स्वरूपाची सेवा सादर केली आहे.
सोपानदेव देवस्थानचे ॲड. त्रिगुण गोसावी यांनी स्वागत केले. गायनामध्ये हार्मोनियमची साथ श्रीकांत देशपांडे, चरेगावकर व तबल्याची साथ अनिकेत देशपांडे यांनी केली.ॲड. विजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात सौ. आशा कुलकर्णी, सौ. मंगल चरेगावकर, प्रमोद गोळे, अरुण पंचवाघ, सूर्यकांत प्रभूणे, प्रदीप जोशी, नंदकुमार जोशी आदींनी भजन व गायन सेवा सादर केली.