
सातारा – किल्ले सिंधुदुर्ग स्वच्छता मोहीमेदरम्यान रवाना होताना जयहिंद व्यायाम मंडळ व मावळा फौंडेशनचे कार्यकर्ते.
स्थैर्य, सातारा, दि. 13 नोव्हेंबर : 104 वर्षाची अखंडित परंपरा असणारे सातारा शहरातील जयहिंद व्यायाम मंडळ, शनिवार चौक सातारा व मावळा फौंडेशन सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु केलेल्या गड किल्ले स्वच्छता मोहीमे अंतर्गत शनिवार दि. 8 नोव्हेंबर रोजी तळ कोकणातील किल्ले सिंधुदुर्ग स्वच्छता मोहिम यशस्वी रित्या पूर्ण केली असल्याची माहिती जयहिंद व्यायाम मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वाघमळे, मावळा फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श विनोद कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.
गड किल्ले स्वच्छता मोहीमेची माहिती देताना वाघमळे यांनी, जयहिंद व्यायाम मंडळ व मावळा फौंडेशन या दोन्ही संस्थांकडे जमा होणारी देणगी व वर्गणी यापैकी एकही पैसा या मोहीमेसाठी वापरला जात नसून सदरची स्वच्छता मोहीम हि दोन्ही संस्थांचे मावळे स्वखर्चातून पार पाडतात. या मोहिमे अंतर्गत स्वच्छतेसाठी दुसर्या वर्षी किल्ले सिंधुदुर्ग ची निवड सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वानुमते केली. प्रत्यक्षात सिंधुदुर्ग किल्ल्यावर अत्यंत स्वच्छता आढळून आली. याबाबत समाधान व्यक्त करून इतर गड किल्ल्यांवरदेखील सर्व लोकांनी अशाच प्रकारची स्वच्छता राहील याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन केले. तसेच सातारा येथे होणार्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये जयहिंद व्यायाम मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रीय सहभागी राहतील अशी ग्वाही दिली.
मावळा फौंडेशनचे विनोद कुलकर्णी यांनी जयहिंद व्यायाम मंडळ सातारा व मावळा फौंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने गेल्या वर्षापासून गड किल्ल्यांची स्वच्छता करण्याची मोहीम हाती घेतली असून गतवर्षी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथून या मोहिमेस सुरुवात करून यावर्षी किल्ले सिंधुदुर्गची स्वच्छता मोहीम पूर्ण केली. युनोस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील ज्या किल्ल्यांचा समावेश केलेला आहे, त्या किल्ल्यांसहित महाराष्ट्रातील सर्व गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच साता-यात होणारे 99 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा शाहूपुरी, सातारा व मावळा फौंडेशनला संयुक्तरीत्या प्राप्त झाला असून जयहिंद व्यायाम मंडळाप्रमाणेच सातारा जिल्ह्यातील सर्व मंडळाच्या सर्व पदाधिकारी / कार्यकर्ते यांनी हे संमेलन यशस्वी, भव्य व ऐतिहासिक होईल यासाठी सक्रीय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. या गड किल्ले स्वच्छता मोहिमेसाठी सातारा येथील सावकार ट्रॅव्हल्स यांनी अल्प दरात गाडी उपलब्ध करून देवून स्वच्छता मोहिमेस हातभार लावला त्याबद्दल धन्यवाद देवून आभार व्यक्त केले. याप्रसंगी जयहिंद व्यायाम मंडळाचे व मावळा फौंडेशनचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
