दैनिक स्थैर्य । दि. १५ जुलै २०२१ । अमरावती । राज्याच्या सिंचन क्षेत्र विकासासाठी माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांनी दूरदृष्टी ठेवून अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची निर्मिती केली. अमरावती जिल्ह्यासाठी जीवनदायी व विकासाची जीवनरेखा ठरलेल्या अप्पर वर्धा धरणाच्या निर्मितीतही त्यांचे मोठे योगदान आहे. हे धरण झाले नसते तर आज दुष्काळ नशिबी आला असता. त्यामुळे विकासाची दूरदृष्टी ठेवून तयार झालेल्या अप्पर वर्धा प्रकल्पाच्या निर्मितीचा इतिहास महत्वाच्या ठिकाणी फलकाद्वारे मांडण्यात यावा. तो सर्वांसाठी मार्गदर्शक ठरेल, असे प्रतिपादन जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चूभाऊ कडू यांनी आज येथे केले.
सिंचन महर्षी व आधुनिक जलसंस्कृतीचे जनक माजी मुख्यमंत्री डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या 101 व्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन सिंचनभवन येथे जलसंपदा राज्यमंत्री श्री. कडू यांनी उपस्थितीत करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा राज्यमंत्र्यांनी स्व. चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी पुष्पाताई बोंडे, डॉ. विजय बोंडे, मुख्य अभियंता अ. ना. बहादूरे, विशेष प्रकल्पाचे मुख्य अभियंता अ. ल. पाठक, अधीक्षक अभियंता रश्मी देशमुख यांच्यासह विभागाचे अभियंता व कर्मचारी उपस्थित होते.
राज्यमंत्री श्री. कडू म्हणाले की, जिल्ह्यात 1965 साली अप्पर वर्धा धरण निर्मितीसाठी प्रचंड विरोध झाला होता. अनेक आंदोलनेही झाली. परंतु, तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी विरोध झुगारून धरण निर्मितीसाठी पुढाकार घेतला होता. धरणाची निर्मिती ही या भागाची गरज होती. त्यामुळे भविष्यात होणारे फायदे व त्यानुषंगाने होणारा सर्वांगीण विकास लक्षात घेऊन दीर्घकालीन व व्यापक समाजहित साधण्याच्या दूरदृष्टीतून हा प्रकल्प आकारास आला.
या निर्मितीमुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी, एमआयडीसीला उद्योग उभारण्यासाठी व जिल्ह्याला मुबलक पाणी मिळाले. स्व. चव्हाण यांनी जर त्यावेळेस हे धाडस केले नसते तर आता आपणाला दुष्काळाला तोंड द्यावे लागले असते. धरण निर्मितीमुळे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागला आहे. त्यांचा विचार हा व्यापक समाजहिताचा व संतांचा विचार होता. अप्पर वर्धा प्रकल्पनिर्मितीच्या प्रारंभापासूनच्या घटनांचा इतिहास सांगणारे फलक प्रकल्पाच्या महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात यावेत, असे निर्देश श्री. कडू यांनी दिले.
अप्पर वर्धा धरणनिर्मितीदरम्यान घडलेल्या विविध प्रसंगांचे कथन श्रीमती पुष्पाताई बोंडे यांनी आपल्या मनोगतातून केले. मुख्य अभियंता श्री. बहादुरे व पाठक यांनीही विभागाच्या योगदानाबाबत माहिती दिली.