ही लढाई स्वाभिमानाची असल्याने प्रा. रमेश आढाव यांचा विजय निश्चित आहे – सचिन अहिवळे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. १४ नोव्हेंबर २०२४ | फलटण |
फलटण विधानसभा मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचलेली असताना संविधान समर्थन समितीनेही कंबर कसली आहे. प्रा. रमेश आढाव यांना निवडून आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत. राजकारणात बेरजेची गणितं करावी लागतात. आपण विजयाच्या उंबरठ्यावर असून सर्वांनी आता एकजुटीने प्रा. आढाव यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायला पाहिजे, असे आवाहन माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांनी विडणी येथील कोपरा सभेदरम्यान केले.

अहिवळे पुढे म्हणाले, संविधान समर्थन समितीच्या वतीने गेल्या तीन महिन्यांपासून आपण संपूर्ण तालुकाभर लोकांशी जनसंपर्क करत होतो. आपली एकच मागणी होती की, बौद्ध समाजाचा आमदार व्हावा. ही मागणी करत असताना आपण प्रस्थापित पक्षाच्या दोन्ही नेत्यांकडे उमेदवारी मागितली होती. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर व रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकडे रितसर मागणी केली. त्यांनी त्यांच्या पक्षाची अडचण सांगितली. त्यावर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रमुख अजित पवार यांची भेट घेऊन समाजाच्या वतीने उमेदवारी मिळावी यासाठी त्यांना विनंती केली होती. त्यांना आपण सांगितलं की, समाजाचं मतदान एकतर्फी जर झालं तर आपला विजय निश्चित होईल. त्यासोबत इतर मराठा व माळी समाज, मुस्लीम, इतर ओबीसी समाज व भटक्या विमुक्त समाजाचे मतदान आपल्याला मिळून आपला उमेदवार निश्चितपणे विजयी होईल, असा विश्वास आपण संविधान समर्थन समितीच्या वतीने दिला; परंतु या प्रस्थापित पक्षांनी आपल्या समाजाला उमेदवारी दिली नाही.

संविधान समर्थन समितीच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक गावांमधील आपल्या बांधवांचा विचार घेऊन आपण अपक्ष उमेदवार उभा करायचा का, असा विचार सर्व समाजबांधवांचा घेऊन संविधान समर्थन समितीने प्रा. रमेश आढाव यांची उमेदवारी निश्चित केली. संपूर्ण फलटण, कोरेगाव मतदारसंघातील समाजबांधवांनीही त्याचं उत्स्फूर्तपणे स्वागतही केले. आपल्या उमेदवाराला प्रहार, स्वराज्य व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संविधान समर्थन समितीला व समितीने दिलेल्या प्रा. रमेश आढाव यांच्या उमेदवारीला बिनशर्त पाठिंबा दर्शवला. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रा. रमेश आढाव यांना आपण या विधानसभेच्या निवडणुकीत उतरवले आहे. राजकारणात आपल्याला बेरजेची गणितं करावी लागतात. जेवढी आपण बेरजेची गणित करू तेवढा आपला विजय हा निश्चित होतो. आता आपण विजयाच्या उंबरठ्यावर आहोत. फक्त आता आपल्याला आपली ताकद समाजाला व संपूर्ण तालुक्याला दाखवण्याची गरज आहे. आपल्या जातीचा उमेदवार लक्षात ठेवा. भविष्यात आपल्याला समाजाची व आपल्या जातीची ताकद दाखवायचे असेल तर ही वेळ आपल्याला पुन्हा येणार नाही. तेव्हा सर्वांनी एकजुटीने आपलं व आपल्या कुटुंबातच नव्हे तर या मतदारसंघांमध्ये असणारे आपले नातेवाईक इतर समाजातील मित्रमंडळी यांनाही मतदान करण्यासाठी आग्रह करा. ही लढाई समाजाच्या स्वाभिमानाची, आत्मसन्मानाची आणि आपल्या जातीच्या अस्तित्वाची आहे. तेव्हा आपापसातील मतभेद विसरून संविधान समर्थन समितीच्या वतीने आपल्या सर्वांची मतं विचारात घेऊन दिलेले उमेदवार प्रा. रमेश आढाव यांना भरघोस मताने विजय करा. हा विजय प्राध्यापक रमेश आढाव यांचा एकट्याचा नसून आपल्या समाजाचा विजय असणार आहे. तेव्हा २० तारखेला मतदान यंत्रावरील पाचव्या क्रमांकाचे रोड रोलर समोरचे बटन दाबून प्रा. रमेश आढाव सर यांना प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन अहिवळे यांनी कोपरा सभेत मतदारांना केले.


Back to top button
Don`t copy text!