स्थैर्य, फलटण, दि. ०३ : फलटण शहर आणि तालुक्यात ८ गावे प्रतिबंधीत क्षेत्र जाहीर करण्यात आली असून त्यामध्ये साखरवाडीचा समावेश असल्याने येथील ग्रामस्थांनी विशेष दक्षता घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र विधान परिषद सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले आहे.
श्री दत्त इंडिया प्रा. लि., साखरवाडी आणि श्री दत्त फाऊंडेशनच्या माध्यमातून साखरवाडी कारखाना परिसरातील रिक्रिएशन क्लब इमारती मध्ये उभारण्यात आलेल्या कोरोना विलगी करण कक्षाचे उदघाटन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप, दत्त इंडियाचे जितेंद्र धरु, प्रशासनाधिकारी अजितराव जगताप, माजी सभापती शंकरराव माडकर, कामगार युनियन अध्यक्ष राजेंद्र भोसले, मच्छिद्र भोसले यांच्या सह कंपनीचे अधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.
फलटण शहर व तालुक्यात कोरोना वाढता प्रादुर्भाव नियंत्रणासाठी प्रशासन अहोरात्र मेहनत घेत आहे, डॉक्टर्स व त्यांचे सर्व सहकारी मोठ्या संख्येने दाखल होणाऱ्या रुग्णांवर उपचार करुन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करीत आहेत, पोलीस प्रशासन योग्य दक्षता घेऊन सुरक्षितता सांभाळण्यात यशस्वी होत असताना जनतेने प्रशासनाचे आवाहन लक्षात घेऊन सार्वजनिक ठिकाणी, रुग्णालयात गर्दी करु नये, मास्क वापरावा, सॅनिटायझर वापर करावा असे आवाहन करतानाच फलटण शहर व ८ गावातील प्रतिबंधीत क्षेत्र अन्य गावात वाढणार नाही यासाठी विनाकारण फिरणे टाळा, घरातच रहा, नियम पाळा असे आवाहन श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी यावेळी केले.
श्री दत्त फाऊंडेशनच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षाचा लाभ घेण्याचे आवाहन करतानाच भविष्यात या फाऊंडेशनच्या माध्यमातून साखरवाडी व परिसराला विविध सुविधा, प्रामुख्याने वैद्यकीय, खेळ, शिक्षण विषयक सुविधा उपलब्ध करुन देण्याचा कंपनीचा प्रयत्न राहणार असल्याचे कंपनीचे संचालक जितेंद्र धरु यांनी सांगितले.
प्रशासनाधिकारी अजितराव जगताप यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत व शेवटी आभार व्यक्त केले.