स्थैर्य, कुडाळ, दि. 29 : जावली तालुक्यातील बेलावडे गावातील मयत व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल रात्री उशीरा प्राप्त झाला. दरम्यान, ही मयत व्यक्ती गावच्या सरपंचांच्या घरातील आहे. सदर मयत व्यक्तीच्या आजाराबाबत गुप्तता ठेवल्याने सरपंचांसह अनेक जणांचा मयत व्यक्तीशी जवळून संपर्क आला असल्याची माहिती स्थानिक लोकांकडून मिळत आहे. गेले दोन महिने सर्वत्र हाहाःकार माजवणार्या करोनाच्या एन्ट्रीने बेलावडेसह संपूर्ण कुडाळ भागातील जनतेचे धाबे दणाणले आहेत.
दरम्यान, अत्यवस्थ असलेल्या व्यक्तीला ग्रामस्थांनी सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील रूग्णालयात उपचारासाठी नेले. परंतु उपचारापूर्वीच ती व्यक्ती मयत झाला असल्याचे सांगून शव घरी घेऊन जाण्याचा अनाहुत सल्ला देण्यात आला. परंतु जागरूक ग्रामस्थांनी सदर व्यक्तीच्या करोना तपासणीसाठी दबाव आणल्यामुळे पुढील अनर्थ टळल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, सदर व्यक्ती, मुलगा, सून व अन्य सहा असे नऊ जण दि.19 मे रोजी मुंबईहुन बेलावडे येथे दाखल झाले. त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले होते. परंतु सदर व्यक्ती नामांकित बँकेतून सेवानिवृत्त झाली असल्याने मान्यवर होती. त्यातच त्याला अर्धांगवायू झाला असल्याने कुटुंबातील अनेक व्यक्ती त्यांच्या सेवेत व संपर्कात होत्या. सदर व्यक्तीला गावी आल्यापासूनच ताप येत होता व अस्वस्थ वाटत होते. परंतु हा आजार आरोग्य सेवक तसेच अन्य लोकांपासून लपवण्याचा प्रयत्न झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान आजार बळावल्याने तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. परंतु यावेळी संपर्कातील संबंधितांनी कोणतीही काळजी घेतली नाही. दरम्यान शासकीय रुग्णालयात नेल्यानंतर ती व्यक्ती मयत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ती व्यक्ती मुंबईहुन आली असल्याने करोना संशयित असल्याने मयताच्या घशातील स्वॅब घेण्यात आला होता. संभाव्य संशयित असल्याने मयत व्यक्तीवर माहुली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान, मयत व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल रात्री उशिरा येताच बेलावडेसह पंचक्रोशीतील लोकांच्या पायाखालची वाळू सरकली. दरम्यान बेलावडे गावाला तहसीलदार शरद पाटील, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, सपोनि. निळकंठ राठोड, पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे, आरोग्य सेवक बी. व्ही. कुलकर्णी यांनी तातडीने भेट देऊन मयत व्यक्तीच्या जवळून संपर्कात आलेल्या सतरा जणांना इंस्टीट्युशनल क्वारंटाईन तर 34 जणांना होमक्वारंटाईन केले. मयत व्यक्ती व संबंधितांना बेलावडे येथे सोडण्यासाठी आलेला वाहन चालक पुन्हा मुंबई ला गेला आहे. तर अन्य दोन जण सातारमध्ये असल्याची माहिती सांगण्यात आली. या घटनेनंतर जावली तालुक्याचे तहसीलदार शरद पाटील यांच्या अहवालानुसार उपविभागीय अधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर मिनाज मुल्ला यांच्या आदेशाने तहसीलदार शरद पाटील यांनी संपूर्ण बेलावडे गाव सील करून संपूर्ण बेलावडे गाव कन्टेमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे बेलावडे गावात स्मशान शांतता पसरली असून ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहे. आता हायरिस्क मधील सतरा लोकांच्या करोना अहवालाची प्रतिक्षा आहे.