कार्यकाल पूर्ण होण्याअगोदरच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या बदलीचे संकेत


 

स्थैर्य, सातारा, दि. २८ : सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकपदाचा तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होण्याअगोदरच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या बदलीचे संकेत प्राप्त होत असल्याने सातपुते यांच्या तेजस्वी ‘कामगिरीचा’ हा ‘राजकीय’ बळी तर नव्हे ना? असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. कायद्यावर बोट ठेवून काम करणार्‍या सातपुते यांना अनेक राजकीय विरोधक निर्माण झाले असतानाही त्यांनी केवळ पावणेदोन वर्षात केलेला जिल्हा पोलीस दलातील कायापालट हा राज्यातील पोलीस दलासाठी पायलट प्रोजेक्ट ठरणार आहे. तेजस्वी सातपुते यांची बदली त्यांच्या कामगिरीचा राजकीय बळी असेल तर सातारकर हाताची घडी घालून गप्प बसणार का त्याबाबत आवाज उठवणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी तेजस्वी सातपुते यांची बदली झाली होती. त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह पोलीस कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट केले होते. पहिल्या वर्षभरात त्यांनी सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवण्याला प्राधान्य दिले. स्वतः तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे  चांगले टीमवर्क निर्माण झाल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे गुन्हे उघडकीस आणण्यात सातारा जिल्हा पोलीस दलाला यश आले. कायद्यावर बोट ठेवून, नियमांना अनुसरून तेजस्वी सातपुते काम करू लागल्यामुळे विविध पक्षातील राजकीय पदाधिकार्‍यांनी त्याचा धसका घेतला होता. त्यामुळे त्यांना अनेक राजकीय विरोधक निर्माण झाले होते. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करत आपले कर्तव्य चोखपणे पार पाडणे सुरूच ठेवले होते.तेजस्वी सातपुते यांनी सूत्रे स्वीकारण्यापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला म्हणावे तसे अधिकार दिले नव्हते. सातपुते यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर काही दिवसातच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंभार यांची बदली झाली. त्यांच्या जागी मुंबई येथून सर्जेराव पाटील यांची बदली झाली. मुंबई पोलीस दलात कामाचा प्रदीर्घ असणारा अनुभव पाहता तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे शाखेची संपूर्ण जबाबदारी सर्जेराव पाटील यांच्यावर सोपवली. सातपुते यांनी दाखवलेला विश्‍वास सार्थ करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अल्पावधीतच अनेक गुन्ह्यांचा उलगडा करत एकापाठोपाठ एक कारवायांचा धडाका लावला. अनेक मोठे गुन्हे उघडकीस आणले.

सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी सजन हंकारे, शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी अण्णासाहेब मांजरे आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी विशाल वायकर असे कर्तव्यदक्ष अधिकारी लागल्यामुळे सातारा शहर, तालुका आणि शाहूपुरी परिसरातील क्राइम रेट कमालीचा खाली आला. त्यामध्ये तेजस्वी सातपुते यांचा फार मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे पहिल्या दीड वर्षांच्या कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या खुनाच्या घटना सातारा जिल्हा पोलीस दलाने अल्पावधीतच उघडकीस आणत संशयितांना तत्काळ जेरबंद करत जिल्ह्यात फक्त कायद्याचेच राज्य चालते,  हे दाखवून दिले.

सातारा जिल्ह्यात मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केला. वैद्यकीय क्षेत्रासह पोलीस दलापुढे हे एक मोठे आव्हान होते. सातारा जिल्ह्यात लॉकडाउन जारी झाल्यानंतर सातारा शहरासह जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवून सर्वसामान्य नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्याचे शिवधनुष्य सातारा जिल्हा पोलीस दलाने तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली लीलया पेलले. ही जबाबदारी पार पाडत असताना सातपुते यांनी पोलीस कर्मचार्‍यांना दिलासा देत कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. तरीही  काही पोलिसांना कोरोनाची बाधा झाली.  त्यातच काही पोलिसांचा मृत्यू झाला. अशा कठीण प्रसंगी तेजस्वी सातपुते पोलिसांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्या. सुमारे अडीच ते तीन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत कराड येथे झालेल्या एका बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला होता. तदनंतर झालेल्या कमराबंद बैठकीमध्ये काही राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील काही अधिकार्‍यांबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यांची नावे समजली नव्हती. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्या दिवशी जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याची घोषणा केली होती. दरम्यानच्या काळात पोलिसांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होत असल्याचे लक्षात येतात तेजस्वी सातपुते यांनी पोलिसांसाठी केवळ चार दिवसात कोरोना हॉस्पिटलची निर्मिती करत त्यांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले. दुसरीकडे सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांची बदली झाली. बदलीबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी झाल्या होत्या असे सांगण्यात आले. या घटनेला चार दिवस उलटतात तोच दोन दिवसांमध्ये गॅझेटनुसार होणार्‍या बदल्यांमध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे नाव असल्याचे वृत्त आज सकाळी थडकले. सातपुते यांना कार्यभार स्वीकारून केवळ पावणेदोन वर्षांचा कालावधी झाला आहे. या काळात त्यांनी केलेले काम सर्वांच्या समोर आहे. सातपुते यांचे नाव गॅझेटमध्ये कसे गेले असा  प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. सातपुते यांची बदली  राजकीय बळी तर नव्हे ना असा प्रश्‍न  उपस्थित होत आहे.

सातारा जिल्ह्यातून उठाव होणार का?..शालेय महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह महिलांची होणारी छेडछाड हा मुद्दा तेजस्वी सातपुते यांनी अत्यंत गांभीर्याने घेतला होता. याबाबत विविध महाविद्यालयांशी चर्चा करून, विद्यार्थिनींचे मेळावे घेऊन त्यामध्ये स्वरक्षण कसे करायचे, याबाबत  धडे दिले जात होते. संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबवून सातारा जिल्हा पोलीस दल तुमच्या पाठीशी आहे, हे त्यांनी दाखवून दिले होते. मुलींच्या संरक्षणाशिवाय सातारा जिल्ह्यातील क्राईम रेट कमी करणे, गुंडांना हद्दपार करणे अशा अनेक कारवाया करून सातपुते यांनी जिल्हा भयमुक्त होण्यास मदत केली होती. अशा अधिकार्‍याची केवळ पावणेदोन वर्षात बदली होत असल्यामुळे जिल्ह्यातून या बदलीच्या विरोधात उठाव होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!