फलटण पालिकेच्या आखाड्यात बंडखोरीचे संकेत

दोन्ही गटांकडून एकमेकांच्या कार्यकर्त्यांशी संपर्क


स्थैर्य, फलटण, दि. ९ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राजे गट आणि खासदार गट या दोन्ही प्रमुख गटांकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत. मात्र, उमेदवारी न मिळाल्यास अनेक इच्छुकांनी विरोधी गटाचा झेंडा हाती घेऊन निवडणूक लढवण्याचा निश्चय केल्याने दोन्ही गटांसमोर बंडखोरीचे मोठे संकट उभे राहिले आहे.

खासदार गटाच्या काही प्रमुख कार्यकर्त्यांकडून राजे गटातील अनेक दिग्गज तसेच दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांशी संपर्क साधला जात असल्याची माहिती समोर येत आहे. उमेदवारीसाठी आग्रही असलेल्या या कार्यकर्त्यांना आपल्याकडे ओढण्यासाठी खासदार गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यामुळे आगामी नगरपरिषद निवडणुकीत राजे गटात बंडखोरी निश्चित मानली जात आहे.

केवळ राजे गटातच नव्हे, तर खासदार गटातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. खासदार गटाकडून उमेदवारी न मिळाल्यास ऐनवेळी राजे गटाची उमेदवारी घेऊन निवडणूक लढवण्याची तयारी काही ठराविक कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. शहरात याबाबत दबक्या आवाजात चर्चा सुरू असून दोन्ही गटांना आपल्या निष्ठावंतांना सांभाळण्याचे आव्हान पेलावे लागणार आहे.

दोन्ही गटांतील अनेक इच्छुकांनी ‘कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवायचीच’ असा चंग बांधला आहे. त्यामुळे जर आपल्या मूळ गटाने उमेदवारी नाकारली, तर प्रतिस्पर्धी गटाकडून उमेदवारी मिळवून रिंगणात उतरण्याची त्यांची मानसिक तयारी झाली आहे. या संभाव्य पक्षांतरामुळे शहरातील राजकीय समीकरणे वेगाने बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ही संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी दोन्ही गटांच्या नेतृत्वाची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. राजे गटाचे नेते आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि खासदार गटाचे नेते माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे आपल्या कार्यकर्त्यांची नाराजी कशी दूर करतात, यावर निवडणुकीचे पुढील चित्र अवलंबून असेल.

बंडखोरांना शांत करण्यासाठी नेते कोणती रणनीती आखतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही प्रभागांमध्ये एकाच गटातून अनेक प्रबळ दावेदार असल्याने तिथे नाराजीचा स्फोट होण्याची दाट शक्यता आहे. अशा वेळी नाराजांची समजूत काढणे आणि त्यांना पक्षात सक्रिय ठेवणे हे नेतृत्वासाठी मोठे आव्हान ठरणार आहे.

उमेदवारी याद्या जाहीर झाल्यानंतरच बंडखोरीचे खरे स्वरूप स्पष्ट होईल. तोपर्यंत दोन्ही गटांकडून एकमेकांच्या नाराज कार्यकर्त्यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरूच राहतील. या राजकीय घडामोडींमुळे फलटण शहरातील निवडणुकीची चुरस आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे.


Back to top button
Don`t copy text!