
स्थैर्य, फलटण, दि. १६: फलटण शहर व तालुक्यात सलग १५ दिवस लॉक डाऊन असूनही दि. १ ते १४ मे दरम्यान ४१३१ कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन आता ग्रामस्थांनी स्वतःची व कुटुंबाची काळजी घेऊन घरातच राहण्याची व विशेष दक्षता घेण्याची आवश्यकता असल्याचे प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी निदर्शनास आणून दिले आहे.
फलटण शहर व तालुक्यात दि. १ ते १४ मे या लॉक डाऊन कालावधीत एकूण ४१३१ बाधीत रुग्ण आढळले आहेत, त्यापैकी २७९ बाधीतांचे वय उपलब्ध नाही. मात्र ३८५२ बाधीतांचे वय उपलब्ध असून त्यापैकी १९ ते ३० वयोगटातील बाधीतांची संख्या सर्वाधिक ९८५ (२५.५७ %) आहे. ० ते १८ वयोगटातील रुग्ण संख्या ४०६ (१०.५३ %), ३१ ते ४० वयोगटातील रुग्ण संख्या ९०४ (२३.४६ %), ४१ ते ५० वयोगटातील रुग्ण संख्या ६३६ (१६.५१ %), ५१ ते ६० वयोगटातील रुग्ण संख्या ४४८ (११.६३ %), ६१ ते ७० वयोगटातील रुग्ण संख्या ३१९ (८.२८ %) असून ७० व त्यावरील रुग्ण संख्या १५४ (४.०० %) असल्याचे प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांनी निदर्शनास आणून दिले आहे.