
स्थैर्य, फलटण, दि. १२ ऑक्टोबर : नाशिक येथे झालेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत फलटणच्या सिद्धी अबॅकस अकॅडमीने उत्कृष्ट यश मिळवत ‘बेस्ट सेंटर’ म्हणून बहुमान पटकावला आहे. अकॅडमीने आपली १८ वर्षांची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली असून, यशस्वी झालेल्या ३१३ विद्यार्थ्यांचा नुकताच एका शानदार समारंभात गौरव करण्यात आला.
येथील अनंत मंगल कार्यालयात दि. ७ ऑक्टोबर रोजी हा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर आणि उपळेकर महाराज देवस्थान समितीच्या सचिव सुभद्राराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता होते.
यावेळी बोलताना संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी, “अबॅकसमुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता वाढते आणि गणितामध्ये त्याचा चांगला उपयोग होतो,” असे सांगत अकॅडमीच्या यशस्वी वाटचालीचे कौतुक केले. मुधोजी हायस्कूलचे माजी प्राचार्य रवींद्र येवले यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये अबॅकसचे विद्यार्थी कसे अग्रेसर राहतात, हे उदाहरणांसह स्पष्ट केले.
या कार्यक्रमासाठी फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम, ब्रिलियंट अकॅडमीच्या संचालिका प्रियदर्शनी भोसले, लायन्स उद्यान समितीचे अध्यक्ष प्रमोद निंबाळकर, ॲड. विजयराव नेवसे यांच्यासह विविध शाळांच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या. यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका सुनीता जाधव, पद्मजा जंगम, सारंग यादव, रेखा खिलारे आणि पूजा गुळसकर यांचेही यावेळी कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाचे स्वागत अकॅडमीचे संचालक एम. व्ही. जाधव यांनी केले, तर सूत्रसंचालन सोनल शिंदे यांनी केले.

