
दैनिक स्थैर्य । दि.०४ एप्रिल २०२२ । फलटण । फलटण येथील सर्वसामान्य कुटुंबातील असलेल्या सिद्धेश माने याची सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ऍग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर स्केल १ म्हणजेच AFO या पदावर निवड झालेली आहे.
अतिशय प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत शिक्षण, आरोग्य, समाजकारण व राजकारण ह्या सर्वामध्ये कार्यरत असताना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे तसे अवघडच असते. परंतु ध्येय मनाशी ठेवून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणे गरजेचे असते व एखादी परीक्षा देवून ती क्रॅक करणे सुद्धा गरजेचे आहे. आज समाजकारण व राजकारण करत असलेल्या युवकांसाठी सिद्धेश माने याने एक आदर्श निर्माण केलेला आहे.
सिद्धेश माने याचे प्राथमिक शिक्षण हे फलटण येथेच झाले. तर माध्यमिक शिक्षण हे फलटण येथील मुधोजी हायस्कुल येथे पूर्ण झाले. त्यानंतर शेती विषयक शिक्षण घ्यायचे हे ठरवल्यामुळे ११ वी व १२ वीचे शिक्षण फलटण येथील शेती शाळेमध्ये पूर्ण झाले. त्यानंतर पदविका शिक्षण हे कृषी महाविद्यालय कराड येथे पूर्ण झाले.
शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुणे येथे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्याचे सिद्धेश याने ठरवले परंतु पुण्यामध्ये गेल्यानंतर सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थांना मध्यवर्ती ठिकाणी अभ्यास करण्यासाठी वाजवी दरामध्ये अभ्यासिका कोठेच नाही हे निदर्शनास आले. त्यानंतर सिद्धेश याने पुणे येथील सदाशिव पेठेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या साठी श्री समर्थ अभ्यासिका सुरु केली. आपल्यासोबतच आपल्या भागातील विद्यार्थी सुद्धा स्पर्धा परीक्षा देऊ शकावेत, यासाठी सिद्धेश याने अभ्यासिका सुरु केली.
फलटण येथील युवक व युवती ह्या पुण्यामध्ये एकत्र करण्यासाठी सिद्धेश माने फलटण फ्रेंड्स असोसिएशनची स्थापना केली. त्यामधून फलटण येथील शिक्षण, नोकरी व व्यवसायाच्या निमित्ताने पुणे येथे स्थायिक झालेल्याना एकत्रित करण्याचे मोठे काम सिद्धेश माने याने केले.
विधानपरिषदेचे सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली फलटण तालुक्यासह राज्यामध्ये विविध समाज उपयोगी उपक्रम संपन्न करण्यासाठी श्रीमंत रामराजे प्रतिष्ठानची स्थापना सिद्धेश माने याने केली. श्रीमंत रामराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम सुद्धा गेल्या काही वर्षांमध्ये सिद्धेश माने याने राबिविले आहेत.
आज फलटण सारख्या निमशहरी भागामधून सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ऍग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर स्केल १ म्हणजेच AFO या पदावर गवसणी घालणे हे अवघड काम सिद्धेश माने याने केलेले आहे. आगामी काळामध्ये फलटण मधून अनेक युवक स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून विविध पदावर गवसणी घालतील हे मात्र नक्की आहे.