
स्थैर्य, फलटण, दि. २२ नोव्हेंबर : फलटण नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ८ मधील भाजपच्या उमेदवार कु. सिद्धाली अनुप शहा यांनी आपल्या प्रचाराला एक तळमळीची आणि भावनिक किनार दिली आहे. त्या मतदारांना सांगत आहेत की, “केवळ माझ्या प्रभागासाठी नाही, तर फलटण शहरातील सर्व नागरिकांच्या विकासासाठी आमची तळमळ आहे आणि आमचा लढा हा सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी आहे.” या आश्वासक भूमिकेमुळे त्या मतदारांशी अधिक जोडल्या जात आहेत.
सिद्धाली शहा यांनी आपल्या प्रचारात कोणताही मोठेपणा न ठेवता, ‘हाऊस टू हाऊस’ (घरोघरी) प्रचारावर भर दिला आहे. प्रभागातील विविध भागांमध्ये नागरिकांच्या रोज त्या गाठीभेटी घेत आहेत. त्यांच्या या तळमळीच्या संपर्कामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दलची आपुलकी वाढत आहे. केवळ तरुण चेहरा म्हणून नव्हे, तर समस्यांची जाण असलेली प्रतिनिधी म्हणून त्या प्रभावी ठरत आहेत.
आपल्या हाऊस टू हाऊस प्रचारामध्ये सिद्धाली शहा अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मतदारांना जागृत करत आहेत. यात आजवर सुरू असलेले सामाजिक काम आणि शासकीय योजनांचा गरजू लोकांना दिलेला लाभ यांचा समावेश आहे. तसेच, भविष्यात उपलब्ध करून द्यावयाच्या सोयी-सुविधा आणि फलटण शहरामध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली होऊ घातलेली विकासकामे यावरही त्या मतदारांशी सविस्तर संवाद साधत आहेत.
एकंदरीत, प्रभाग क्रमांक ८ मध्ये कु. सिद्धाली शहा यांनी विकासाचे व्हिजन आणि सामाजिक बांधिलकी या दोन स्तंभावर आपला प्रचार उभा केला आहे. सर्वांच्या उज्वल भविष्यासाठी लढण्याची त्यांची ही भूमिका मतदारांना आकर्षित करत आहे. या युवा नेतृत्वाला आणि भाजपच्या ताकदीला मतदार किती मोठा पाठिंबा देतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

