
स्थैर्य, फलटण, दि. १४ नोव्हेंबर : फलटण नगरपरिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 8 मधून भारतीय जनता पार्टीच्या (खासदार गट) संभाव्य उमेदवार सिद्धाली अनुप शहा यांनी प्रचार कार्यात आघाडी घेतली आहे. शिवाजी रोड परिसरात त्यांनी घरोघरी जाऊन संपर्क मोहीम राबवली असून, या दौऱ्याला नागरिकांचा, विशेषतः महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
सिद्धाली शहा यांनी शिवाजी रोडवरील प्रत्येक घरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले, तर लहान मुलांशी मनमोकळ्या गप्पा मारत त्यांना खेळणी दिली. यामुळे प्रचाराच्या वातावरणात एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. लहानग्यांच्या चेहऱ्यावरील हास्य आणि ज्येष्ठांचे आशीर्वाद यामुळे जीवन धन्य झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या संपर्क दौऱ्यादरम्यान परिसरातील महिला मोठ्या संख्येने सिद्धाली शहा यांच्यासोबत सहभागी झाल्या होत्या. महिलांनी त्यांचे ठिकठिकाणी स्वागत केले. सिद्धाली शहा यांनी महिलांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. महिलांचा हा उत्स्फूर्त सहभाग त्यांच्या उमेदवारीला बळ देणारा ठरला आहे.
यावेळी मतदारांशी बोलताना सिद्धाली शहा म्हणाल्या की, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील आणि जिल्हा नियोजन समितीच्या सदस्या जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अनुप शहा यांच्या माध्यमातून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. प्रभागातील नागरिकांच्या कोणत्याही अडचणीला तत्परतेने प्रतिसाद देऊन, ‘एका हाकेला धावून येत’ आम्ही कामकाज करणार आहोत, असा विश्वास त्यांनी यावेळी मतदारांना दिला.
सिद्धाली शहा यांनी प्रभागातील विकासाचा रोडमॅप मतदारांसमोर मांडला. पायाभूत सुविधांसोबतच सामाजिक सुरक्षिततेवर भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या भूमिकेचे शिवाजी रोड परिसरातील नागरिकांनी स्वागत केले आहे.
प्रभाग क्रमांक १० मध्ये भाजपच्या या प्रचार मोहिमेला मिळत असलेल्या प्रतिसादामुळे राजकीय वातावरण तापले आहे. सिद्धाली शहा यांच्या थेट संपर्कामुळे आणि विकासकामांच्या आश्वासनामुळे मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल सकारात्मक चर्चा सुरू झाली आहे.
