दैनिक स्थैर्य | दि. २८ ऑक्टोबर २०२१ | सातारा | सातारा येथील मध्यवर्ती बसस्थानकात फलाट क्रमांक तीनवर झोपलेल्या युवकाचा गारठून मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून मृत्यू झालेला युवक परप्रांतिय असून ब्रिजमोहन भूतनाथ यादव (वय 25, रा. छत्तीसगड) असे गारठून मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. दरम्यान, या घटनेनंतर यादव याच्या छत्तीसगडमधील नातेवाइकांना पोलिसांनी याची माहिती दिली असून, रात्री उशिरा त्याचे नातेवाइक सातार्याकडे येण्यासाठी निघाले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, ब्रिजमोहन यादव हा गोव्यातील एका हॉटेलमध्ये काम करत होता. मात्र, तो आजारी असल्याने आपल्या गावाकडे निघाला होता. सोमवारी रात्री तो सातारा बसस्थानकात आला होता. रात्री एक वाजल्यामुळे त्याला पुढील प्रवासासाठी बस मिळाली नसल्याने तो येथेच फलाट क्रमांक पाचवर झोपला. पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तो कुठून आल आहे आणि कोठे निघाला आहे याची माहिती दिली आणि सकाळी बसने गावी जाणार असल्याचे सांगितले. यानंतर तो झोपी गेला. दरम्यान, मंगळवारी सकाळी आठ वाजल्यातरी ब्रिजमोहन यादव झोपेतून उठला नाही. पोलिसांनी त्याच्या अंगावरील चादर काढली असता तो काहीच हालचाल होत नसल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याला रुग्णवाहिकेतून क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्यांनी दिली. दरम्यान, त्याचा मृत्यू थंडीने गारठून झाला असल्याचे यावेळी रुग्णालयातून सांगण्यात आले.