
दैनिक स्थैर्य | दि. १५ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
फलटण तालुक्यातील शंभू महादेवाच्या डोंगररांगात वसलेल्या बोडकेवाडी येथील शेतकरी कुटुंबातील शाम जाधव यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतलेल्या परीक्षेत महाराष्ट्र शासनाच्या महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे. त्याच्या या निवडीमुळे जाधव परिवारासह परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्यावर तालुक्यातील सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
शाम यांचे प्राथमिक ते दहावीपर्यंतचे शिक्षण बोडकेवाडी व गिरवी येथे झाले, तर कृषी पदविका शिक्षण, कराड येथील दादासाहेब मोकाशी कृषी महाविद्यालय राजमाची येथे पूर्ण केले. शेतकरी असलेल्या आई-वडिलांना आपल्या मुलाने शिकून मोठं व्हावे व मुलाला घडवण्यासाठी केलेले कष्ट शामने अनुभवले होते. त्यातूनच आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज करण्यासाठी शामने जिद्दीने चिकाटीने खडतर परिस्थितीत रात्रंदिवस अभ्यास करून हे यश संपादन केले आहे.
मित्र, पुस्तक, रस्ता आणि विचार योग्य असतील तर आयुष्य सुंदर होते, असे म्हणत शामने त्याच्या यशात त्याचे आईवडील, मित्र व पत्नी यांचाही सहभाग असल्याचे सांगितले. या यशानंतर गावकर्यांनी शामचे स्वागत करत कौतुक केले.
शिक्षण घेत असताना आपल्या आईवडिलांनी आपल्याला घडवण्यासाठी घेतलेले काबाडकष्ट डोळ्यांपुढे ठेवून तसेच चांगल्या मित्रांची संगत धरली तर यश नक्की मिळते. मला या यशापर्यंत नेण्यात माझ्या आईवडिलांचे मोल अनमोल आहेत, अशी भावना शाम यांनी व्यक्त केली. स्पर्धा परीक्षा आणि त्यासाठीची तयारी ही सामान्यतः कठीण आणि आव्हानात्मक असते. मात्र, शाम जाधव यांनी अडचणींवर मात करत, कोणत्याही खासगी कोचिंगशिवाय अथक मेहन करून हे यश संपादन केले. त्या यशाबद्दल बोडकेवाडील नेहरू युवा मंडळ, जाणता राजा मित्रमंडळ व साई ग्रुप व गिरवी गावासह संपूर्ण फलटण तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या जिद्दीचे आणि मेहनतीचेच हे फळ आहे, असे मत परिसरातील शिक्षक, समाजसेवक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केले.