श्रीराम कारखान्याची ७० वी वार्षिक सभा संपन्न; १० हजार टन क्षमतेसाठी अडसाली लागवड कमी करा – श्रीमंत संजीवराजे

ऊस विकास आणि आधुनिक तंत्रज्ञानावर भर देण्याचे सभासदांना आवाहन; सुरू व पूर्व-हंगामी लागवडीसाठी अनुदान देण्याचा विचार


स्थैर्य, राजाळे, दि. ३० सप्टेंबर : फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखाना लि. ची ७० वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवारी ऊस उत्पादक शेतकरी व सभासदांच्या मोठ्या उपस्थितीत आणि उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाली. या सभेसाठी विधानपरिषदेचे माजी सभापती, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

या सभेस माजी आमदार दिपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, कारखान्याचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे यांच्यासह सर्व संचालक मंडळ व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सभासदांना मार्गदर्शन करताना श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी कारखान्याच्या भवितव्यासाठी ऊस नियोजनाचे महत्त्व पटवून दिले. ते म्हणाले, “भविष्यात आपल्याला कारखाना दहा हजार मेट्रिक टनांपर्यंत न्यायचा असेल, तर सभासद, शेतकरी, संचालक आणि कामगार या सर्वांनी मिळून प्रयत्न करणे आणि सहकार्य करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी आपला सर्व ऊस श्रीराम कारखान्यालाच दिला पाहिजे.”

“सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उसाची अडसाली लागवड कमी झाली पाहिजे,” यावर जोर देत ते म्हणाले, “अडसाली उसाचे प्रमाण वाढल्यामुळे कारखान्याच्या संपूर्ण आर्थिक आणि व्यवस्थापकीय नियोजनावर थेट परिणाम होतो. साखर उतारा घटतो, गाळप हंगाम लांबतो आणि यंत्रांच्या देखभालीसाठी कमी वेळ मिळतो. यामुळेच ऊस वेळेत जात नाही, अशा तक्रारी येतात.”

यावर उपाय म्हणून, “शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त पूर्व-हंगामी तसेच सुरू हंगामी ऊस लागवडीवर भर दिला पाहिजे. हा ऊस उशिरा गाळपासाठी येणार असल्याने, अशा लागवडींसाठी वेगळे अनुदान देण्याचा विचार कारखाना व्यवस्थापन करत आहे,” असे आश्वासनही श्रीमंत संजीवराजे यांनी दिले.

शेतकऱ्यांनी ‘ऊस विकास’ (Cane Development) या विषयावर गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. “कारखान्यामार्फत उसाची गुणवत्ता व उत्पादन वाढवण्यासाठी सुधारित वाणांची निवड, आधुनिक लागवड तंत्र, ठिबक सिंचन, माती परीक्षण आणि पाचट व्यवस्थापनावर कार्यशाळा घेतल्या जात आहेत. हुमणीच्या नियंत्रणासाठी जैविक औषधेही उपलब्ध केली आहेत. शेतकऱ्यांनी या सर्वांचा लाभ घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!