स्थैर्य, फलटण दि.३१ : श्रीराम शेतकरी कामगार सहकारी ग्राहक संस्थेने (श्रीराम बझार) गेल्या 30 वर्षात सभासद/ग्राहकांना दर्जेदार माल रास्त दरात उपलब्ध करुन देण्याची परंपरा जोपासली असून सहकारातील या संस्थेची ही कामगिरी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन सहाय्यक निबंधक सहकारी संस्था सुनील धायगुडे यांनी केले आहे.
श्रीराम बझारच्या मुख्य कार्यालय परिसरात प्रतिवर्षाप्रमाणे उभारण्यात आलेल्या फटाका स्टॉलचे उदघाटन सहाय्यक निबंधक सुनील धायगुडे यांचे हस्ते फित कापून करण्यात आले, त्यावेळी बझारचे माजी चेअरमन महादेवराव पवार, चेअरमन जितेंद्र पवार, व्हा. चेअरमन दिलीपसिंह भोसले, संचालक मंडळ, जनरल मॅनेजर संभाजीराव पाटील व अधिकारी, कर्मचारी, सभासद, ग्राहक उपस्थित होते.
श्रीराम बझारने ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देऊन राबविलेल्या विविध ग्राहकोपयोगी उपक्रमांचे सातत्य कायम ठेवून केलेली प्रगती अखंडित सुरु ठेवून शहर व तालुक्यातील ग्राहकांना सेवा देताना त्याचा विस्तार करुन जास्तीत जास्त ग्राहकांना याचा लाभ देता येईल यासाठी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा सहाय्यक निबंधक धायगुडे यांनी व्यक्त केली आहे.
प्रारंभी जनरल मॅनेजर संभाजीराव पाटील यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत व मान्यवरांचा सत्कार केल्यानंतर प्रास्तविकात बझारच्या प्रगतीचा आढावा घेताना कोरोनाच्या कालावधीत सर्व शासकीय नियम, निकष सांभाळून ग्राहकांना दर्जेदार सेवा, सुविधा देण्याचा यशस्वी प्रयत्न केल्याचे निदर्शनास आणून देत आगामी दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी ग्राहकांनी आपली दीपावली खरेदी थोडी अगोदर करावी असे आवाहन जनरल मॅनेजर पाटील यांनी केले आहे.
श्रीराम बझारने प्रत्येक वर्षी विक्रीचे नवे उच्चांक प्रस्थापित करताना आपल्या दर्जेदार ग्राहक सेवा, उत्कृष्ट माल, रास्त दर या त्रिसूत्रीला अधिक बळकटी देण्याचा प्रयत्न केल्याचे नमूद करीत गतवर्षी बझारची वार्षिक विक्री 72 कोटी 85 लाख रुपये होती तर गतवर्षी दिवाळीच्या 10 दिवसात 6 कोटी 10 लाख रुपयांची विक्री घेऊन बझारने एक नवा विक्रम नोंदविला, गतवर्षी केवळ फटाका स्टॉलची विक्री 13 लाख रुपये होती. यावर्षीही ग्राहकांना दर्जेदार सेवा देण्याकरिता बझारचे व्यवस्थापन त्रिसूत्रीच्या माध्यमातून प्रयत्नशील असल्याचे जनरल मॅनेजर संभाजीराव पाटील यांनी सांगितले.
बझारचे चेअरमन जितेंद्र पवार यांनी उपस्थित मान्यवर व ग्राहकांना दीपावली सणाच्या निमित्ताने आगाऊ शुभेच्छा देत समारोप व आभार प्रदर्शन केले.