
स्थैर्य, फलटण, दि. २६ ऑगस्ट : श्रीमंत शिवाजीराजे इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुका आणि जिल्हास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत घवघवीत यश मिळवत, विद्यार्थी श्रेयश भोसले याची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
सातारा जिल्हा ॲमॅच्युअर ॲथलेटिक्स असोसिएशनने शाहू स्टेडियम येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धेत, श्रेयश भोसले याने सोळा वर्षे वयोगटात गोळाफेकमध्ये प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक, तर भालाफेकमध्ये द्वितीय क्रमांक मिळवत रौप्यपदक पटकावले. या कामगिरीमुळे त्याची २ सप्टेंबर रोजी बालेवाडी, पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
तालुकास्तरावरही पदकांचा पाऊस
तत्पूर्वी, फलटण तालुका ॲथलेटिक्स असोसिएशनने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवले. शाळेच्या ३० विद्यार्थ्यांपैकी ८ विद्यार्थ्यांनी पदके आणि प्रमाणपत्रे मिळवली.
- सुवर्णपदक विजेते: श्लेशा काळे (गोळाफेक, १६ वर्षांखालील), श्रावणी पिंगळे (गोळाफेक, १४ वर्षांखालील), प्रणय जगताप (१०० मी. धावणे, १६ वर्षांखालील).
- रौप्यपदक विजेते: सई नांगरे, श्रेयस भोसले, धवल नलावडे (सर्व गोळाफेक), संघर्ष मोरे (४०० मी. धावणे).
- कांस्यपदक विजेती: आतिफा मुलानी (गोळाफेक, १२ वर्षांखालील).
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व आमदार रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सचिव संजीवराजे नाईक निंबाळकर, प्रशासकीय अधिकारी अरविंद निकम यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापिका अंजुम शेख, क्रीडा शिक्षक सुहास कदम यांचे अभिनंदन केले आहे.