दैनिक स्थैर्य | दि. १२ जानेवारी २०२५ | फलटण |
श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय फलटणतर्फे तरडगाव (ता. फलटण) येथे राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरडगाव येथे दि. १३ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत सात दिवस राष्ट्रीय सेवा योजना शिबिर ‘युथ फॉर माय भारत/युथ फॉर डिजिटल लिटरसी’ या घोषवाक्याखाली आयोजित केले आहे.
या श्रमसंस्कार शिबिरांतर्गत समाज प्रबोधनपर व्याख्यानमाला कार्यक्रम, प्रभात फेरी, आरोग्यविषयक जनजागृती, जलसंवर्धन आणि जैवविविधता, माती व पाणी परीक्षण, स्त्री सक्षमीकरण अशा विविध व्याख्यानमाला कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तसेच विशेष प्रात्यक्षिक उपक्रम म्हणून ग्रामस्वच्छता, कांदा प्रक्रिया पदार्थ प्रशिक्षण, रस्ता दुरुस्तीकरण, समाजप्रबोधन फेरी व पटनाट्य, गिर्यारोहक व विविध क्रीडा स्पर्धा, वृक्षारोपण कार्यक्रम व परसबाग निर्मिती, पालक शिबिर भेट, दुग्ध प्रक्रिया पदार्थ प्रशिक्षण, माती परीक्षण कार्यशाळा इ. विषय या शिबिरात अभ्यासले जाणार आहेत.
शिबिराचे उद्घाटन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी, फलटण एज्युकेशन सोसायटी फलटण तथा माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारा हे प्रमुख अतिथी म्हणून व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दीपकराव चव्हाण, माजी आमदार हे उपस्थित राहणार आहेत.
या शिबिरासाठी प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. पी. तरटे, प्रा. एम. एस. बिचुकले, विद्यार्थी कल्याण अधिकारी, सर्व महाविद्यालयीन समिती सदस्य, प्राध्यापक व प्राध्यापिका, प्राध्यापकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व तरडगाव ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे.