दैनिक स्थैर्य । दि. २९ मार्च २०२२ । फलटण । महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधील वक्तृत्व कलेला वाव मिळावा, यासाठी मुधोजी महाविद्यालय, फलटण येथे प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही दि. ३१ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.३० वा. श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे उद्घाटन फलटण पंचायत समिती माजी सभापती युवा नेते श्रीमंत विश्वजीतराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्तेसमारंभपूर्वक होणार आहे. पदवी ते पदव्युत्तर वर्गातील कोणत्याही ज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल. प्रवेश फी नाही परंतू पूर्व नाव नोंदणी आवश्यक असून महाविद्यालयात दि. ३१ मार्च पर्यंत नावे नोंदविता येणार आहेत.
स्पर्धेसाठी देण्यात आलेले विषय १) नाईक निंबाळकर राजघराण्याचा वैभवशाली इतिहास, २) स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव : एक अवलोकन, ३) नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, ४) पर्यावरणीय समस्या : युवकांचे योगदान, ५) युद्ध : साम्राज्य विस्तार की मानवी संहार ?.
विजेत्या स्पर्धकांना प्रथम क्रमांक ५ हजार रुपये रोख व चषक, द्वितीय क्रमांक ३ हजार रुपये रोख व चषक, तृतीय क्रमांक २ हजार रुपये रोख व चषक आणि उत्तेजनार्थ एक हजार रुपये रोख.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ स्पर्धा संपल्यानंतर लगेचच होईल. कार्यक्रमाचा समारोप व बक्षीस वितरण श्रीमंत सत्त्यजितराजे नाईक निंबळकर यांच्या हस्ते होणार आहे. या स्पर्धेमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी बहुसंख्येने सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी करावी, असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पंढरीनाथ कदम यांनी केले आहे.