अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत संजीवराजे यांचा वाढदिवस सोहळा स्थगित


स्थैर्य, फलटण, दि. २७ सप्टेंबर : राज्यात, विशेषतः मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या गंभीर परिस्थितीची जाणीव ठेवून, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा येत्या ९ ऑक्टोबर रोजी होणारा ६१ वा वाढदिवस सोहळा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबतची माहिती माजी आमदार दिपक चव्हाण यांनी एका व्हिडिओद्वारे दिली आहे. ते म्हणाले की, “गेल्या तीन-चार दिवसांत राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे २२ लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यातच हजारो कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. ही परिस्थिती पाहता, आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर आणि राजे गटाच्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी मिळून हा मोठा वाढदिवस सोहळा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.”

फलटणच्या राजघराण्याने नेहमीच अशा आपत्कालीन परिस्थितीत मदतीचा हात पुढे केला आहे. यापूर्वी सांगली येथील पूरग्रस्तांनाही फलटणमधून मोठी मदत पाठवण्यात आली होती. त्याच धर्तीवर, यंदाचा वाढदिवस साजरा न करता, त्याऐवजी पूरग्रस्त शेतकऱ्यांना आणि कुटुंबांना मदत गोळा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नागरिकांनी वस्तूंच्या स्वरूपात मदत करावी, असे आवाहन करताना चव्हाण यांनी चारा, धान्य, कपडे, ब्लँकेट आणि इतर जीवनावश्यक वस्तू जमा कराव्यात, जेणेकरून फलटण तालुक्याच्या वतीने या सर्व वस्तू गरजू शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येतील, असे सांगितले.


Back to top button
Don`t copy text!